जिल्हा माहिती कार्यालयात ‘हरित’ शपथ
हिंगोली : माझी वसुंधरा अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी कार्यालयात हरित शपथ घेण्याबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आदेशित केले होते. त्याअनुषंगाने जिल्हा माहिती कार्यालयात हरित शपथ घेण्यात आली.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी, वरिष्ठ लिपिक आशाताई बंडगर, लिपिक टंकलेखक अनिल चव्हान, कैलास लांडगे, संदेशवाहन परमेश्वर सुडे उपस्थित होते.
१ ते १७ जानेवारीदरम्यान वाहन तपासणी विशेष मोहीम
हिंगोली : ३२ व्या रस्ते सुरक्षा महिना -२०२१ अंतर्गत १८ जानेवारीपासून हिंगोली जिल्ह्यात रस्ते सुरक्षा अभियान होत असून, त्याची पूर्वतयारी म्हणून वाहतूक नियम मोडणाऱ्या विरोधात १ ते १७ जानेवारीपर्यंत वाहन तपासाणी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. विनाहेल्मेट दुचाकी वाहन चालविणे, वाहन चालविताना सिटबेल्टचा वापर न करणे, सुसाट वाहन चालवणे, अवैध प्रवासी वाहतूक, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, प्रवासी वाहनातून माल वाहतूक करणे, भारक्षमतेपेक्षा अतिरिक्त मालवाहतूक करणे, वेगाने वाहन चालविणे, दारु पिऊन किंवा अमली पदार्थांचे सेवन करुन वाहन चालविणे इत्यादी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई म्हणून अनुज्ञप्ती तसेच वाहननोंदणी निलंबनाची कार्यवाही करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक कळंबरकर, माने, कोपुल्ला यांची नेमणूक करण्यात आली आहे.
वगरवाडी क्षेत्रात गोळीबार सराव
हिंगोली : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २२ अन्वये व मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३३(१)(ख) व (प) नुसार वगरवाडी ता. औंढा येथील फायरींग रेंज सर्वे नं. २५ व २९ या परिसरात २ ते १५ जानेवारीपर्यंत पोलीस कर्मचाऱ्यांना वार्षिक गोळीबारीचा सराव करण्यास परवानगी देण्यात येत आहे.
या कालावधीत गोळीबार सरावासाठी मैदान उपलब्ध करून देण्यात येत आहे. याठिकाणी धोकादायक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. परिसरात गुरांना न सोडणे व कोणत्याही व्यक्तीने त्या क्षेत्रात प्रवेश करू नये, अशा सूचना पोलीस अधिकाऱ्यांनी दवंडी व ध्वनिक्षेपकाद्वारे संबंधितांना दिल्या आहेत.