कळमनुरी : औंढा नागनाथ येथील नागनाथ संस्थानकडून गोरगरिबांना वाटण्यासाठी आलेल्या किट पालिका प्रशासनाच्या परवानगीविना परस्पर घेवून गेल्या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात नगराध्यक्षासह १२ नगरसेवकांविरूद्ध ७ आॅगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणात अखेर कारवाई झाली.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या टाळेबंदीमुळे २0 एप्रिल रोजी औंढा नागनाथ येथील नागनाथ संस्थानने कळमनुरी नगरपालिकेला ५00 किट पाठविल्या होत्या. त्या नगरपालिकेने उतरवून घेतल्या. मात्र त्या किट वाटपाबाबत प्रशासनाकडून कारवाई होणे अपेक्षित असताना नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी त्या किट परस्पर नेल्या. यासाठी न.प. कर्मचाऱ्यांवरही दबाव आणला होता. याबाबत तक्रारी झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी चौकशीही केली होती. मात्र चौकशीत नगराध्यक्षांसह बारा नगरसेवक व प्रशासनावरही ठपका ठेवला होता.
प्रशासनातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करून मुख्याधिकाऱ्यांच्या चौकशीचा प्रस्ताव पाठविण्याचा आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढला होता. मात्र नंतर न.प. कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केल्याने तो मागे घेतला गेला. नगराध्यक्षांसह नगरसेवक शिवसेनेचे असल्याने सत्ताधाऱ्यांना प्रशासनाकडून अभय दिले जात असल्याचा आरोपही होत होता. त्यानंतर हे प्रकरण मूळ तक्रारदार नंदकिशोर तोष्णीवाल यांनी उच्च न्यायालयात दाखल केले होते. त्यानंतर पुन्हा कारवाईचे आदेश दिले होते.
या प्रकरणात ७ आॅगस्ट रोजी मुख्याधिकारी उमेश कोठीकर यांनी कळमनुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख, नगरसेवक रत्नमाला कऱ्हाळे, आप्पाराव शिंदे, मीरा डुरे, सुमनबाई बेंद्रे, राजू संगेकर, शंकुतलाबाई बुर्से, पार्वतीबाई पारवे, संतोष सारडा, सविता सोनुने, शेख सईदा यांच्याविरूध्द कलम १८६, १८८, २६९, ३४ भादंवि सह कलम ५१(क)(ख) ५३ आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम १३५ म़पोक़ायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
नोटीस देऊनही किट परत केल्या नाहीतफिर्यादीत म्हटले की, आरोपीतांनी संगनमत करून औंढा संस्थानकडून २0 एप्रिलच्या पत्रान्वये गरीब, कष्टकरी, मजूर अशा गरजू लोकांच्या दैनंदिन अन्नाची गरज भागविण्याकरिता अन्नधान्याच्या एकूण ५०० किट प्राप्त झाल्या होत्या. त्याच्या वाटपाबाबत कोणताही आदेश नसताना व जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी व कोरोना विषाणू प्रतिबंधसंदर्भात आदेश असताना आरोपीतांनी नगरपालिका क़र्मचाऱ्यांवर दबाव टाकून २३ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता नगरपालिका क़ार्यालय हॉलमधून ५०० किट घेवून गेले़ या किट परत करण्याबाबत संबंधितांना नोटिसा बजावूनही किट जमा केल्या नाहीत़ पुढील तपास सपोउपनि आऱपी़जाधव हे करीत आहेत़