हिंगोली : या वर्षी घनवन लागवडीवर जास्त प्रमाणात भर देत जिल्ह्यात ५ लाख ४४ हजार रोपे लावण्यात येणार आहेत. यात घनवन लागवडीवर जास्त प्रमाणात भर देण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी विभागीय वन अधिकारी एम. आर. शेख यांनी दिली.
जपानच्या धर्तीवर घनवन लागवड (मियावाकी) पद्धतीने विविध झाडांच्या रोपांची लागवड केली जाणार आहे. पर्यावरण दिनी ५ लाख ४४ हजार रोपे लावण्याचा संकल्प सोडला असून, यात लिंब, करंज, सागवान, कवर, सीताफळ, किनी, बोर, वड, पिंपळ, पांगरा, शिसू, सिरस या रोपांचा समावेश राहणार आहे. जिल्ह्यात वन विभागासाठी २८ हजार हेक्टर राखीव वनक्षेत्र आहे. यात हिंगोली व कळमनुरीमध्ये ७ हजार हेक्टर, वसमत ३ हजार ५०० हेक्टर, सेनगाव ५ हजार ५०० हेक्टर, औंढा ११ हजार हेक्टर राखीव वनक्षेत्र आहे. हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी वन विभागाच्या रोपवाटिका आहेत. या रोपवाटिकेत झाडांची रोपे जोपासली गेली आहेत. घनवन लागवडीत रोपे कमी पडल्यास ती इतर ठिकाणावरून मागविण्यात येणार आहेत.
गतवर्षीपेक्षा या वर्षी पावसाळा चांगला राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे लावलेली रोपे चांगली उगवतील, असे वाटते. पावसाने साथ नाही दिली तर पाण्याची व्यवस्था करून रोपांना पाणी घातले जाणार आहे.
जंगल हिरवेगार केले जाणार...
आजमितीस जंगलात झाडे आहेत पण कमी प्रमाणात. जिल्ह्यातील पाचही तालुक्यांतील वन विभागाची जमीन हिरवीगार कशी करता येईल, याचा प्रयत्न केला जाणार आहे. रोपे जगविण्यासाठी वन विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्तीही केली जाणार आहे. यासाठी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शनही केले जाणार आहे.
गतवर्षी लावली साडेसहा हजार रोपे
गतवर्षी कोरोना महामारीत लॉकडाऊन होते. त्यामुळे जास्त रोपे लावता आली नाहीत. तरीही सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केल्यामुळे ६ हजार ५०० रोपे लावली आहेत. लावलेली सर्व रोपे जिवंत असून, मोठी झाल्यास पक्ष्यांना बसण्यासाठी सोयीचे होणार आहे.
- विश्वनाथ टाक, प्रभारी सहायक वन संरक्षक, हिंगोली.