हिंगोली: जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना जिल्हा रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या वयाच्या प्रमाणपत्रांसाठी मात्र ज्येष्ठ नागरिकांनी गर्दी केल्याचे शुक्रवारी पहायला मिळाले. यामुळे कोरोना नियमांचा फज्जा उडाला आहे.
वयाचे प्रमाणपत्र देण्याचा मंगळवार आणि शुक्रवार हा दिवस जिल्हा रुग्णालयाच्या वतीने ठरवून देण्यात आलेला आहे. एरव्हीची बाब वेगळी आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे. अशावेळी प्रमाणपत्र देणे बंद करायला पाहिजे. परंतु, प्रमाणपत्र दिले जात आहे. प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शहर तसेच जिल्ह्यातील ज्येष्ठांनी तोबा गर्दी केली होती. एक-दोन वगळता बाकीच्यांनी मास्क घातलेला नव्हता.प्रमाणपत्र मिळविण्यासाठी महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.
कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात वाढू लागल्याने जिल्हा रुग्णालयाच्या वतीने मास्कविना फिरु नका, सॅनिटायझरचा वापर करा, अशा सूचना दिल्या जात आहेत. परंतु, जिल्हा रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावर दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रासाठी मात्र सुचनांचे पालन होताना दिसून येत नव्हते. याबाबत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मंगेश टेहरे यांना विचारले असता ते म्हणाले, ठरल्याप्रमाणे शुक्रवारी दीडशे जवळपास प्रमाणपत्र दिले. उर्वरित लोकांना पुढची तारीख दिली आहे. कोरोनाच संसर्ग लक्षात घेता प्रमाणपत्र देणे बंद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सुरक्षारक्षही झाला हतबल
प्रमाणपत्र मिळविण्यासाठी झालेली गर्दी पाहून जिल्हा रुग्णालयाने नेमलेला सुरक्षा रक्षकही हतबल झाला होता. उपस्थितांना ‘सामाजिक अंतर ठेवा, मास्क लावा’ अशा सूचना देत होता. परंतु, कोणीही त्याचे ऐकत नव्हते. कोणीही जागेवरुन सरकरण्याचे नाव घेत नव्हते. दरववेळेस प्रमाणपत्रा मिळविण्यासाठी अशीच रांग लावावी लागते, प्रमाणपत्र उशिराच मिळते, अशा तक्रारीही ज्येष्ठांनी केल्या.