लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राज्य राखीव दल पोलीस भरती घोटाळ्यातील अटक केलेल्या चार आरोपींना १७ जुलै रोजी हिंगोली न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने आरोपींना २० जुलैपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आतापर्यंत राज्य राखीव पोलीस भरती घोटाळ्यातील आरोपींची संख्या ३० झाली आहे.हिंगोली येथील राज्य राखीव दल भरती घोटाळ्यातील आरोपींची धरपकड सुरूच आहे. हिंगोली येथील सन २०१३, २०१४ व २०१७ या कालावधीत पोलीस भरती घोटाळा उघडकीस आला होता. नांदेडनंतर हिंगोली येथील भरती घोटाळा समोर आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. या घोटाळ्याच्या चौकशीनंतर आरोपींचा पथकाद्वारे कसून शोध सुरू घेतला जात आहे. पोलीस भरती घोटाळ्यातील आतापर्यंत ३० आरोपींना पथकाने अटक केल्याची माहिती उपविभगीय पोलीस अधिकारी राहूल मदने यांनी दिली. विविध ठिकाणी पथक जाऊन आरोपींना अटक करत आहे. तर काही आरोपींना नांदेड कारागृहातून अटक करण्यात आली. १६ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास राज्य राखीव पोलीस भरती घोटाळ्यातील तीन जवान हिंगोली पोलिसांसमोर स्वत:हून हजर झाले. आरोपी सुभाष दशरथ रिठ्ठाड, उद्धव शिवरा धोत्रे, गोरक्षनाथ धोंडूजी कोकाटे हे तीन आरोपी स्वत:हून पालिसांसमोर हजर झाले होते. तर गोविंद ढाकणे यास अटक केली. या चारही आरोपींना पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना २० जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
आरोपींना चार दिवसांची कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:47 AM