हबीब शेख,औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : शनिवारी दुपारी येलदरी धरणाची दोन विद्युत जनित्रे चालू करून १ हजार ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात आला. परिणामी सिद्धेश्वर जलाशयाच्या पाणीपातळीत रविवारपासून वाढ होत आहे. त्यामुळे सिद्धेश्वर धरणाचे चार दरवाजे उघडून ५ हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. तसेच जलसंपदा विभागाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
शुक्रवारी बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे खडकपूर्णा धरणातून जवळपास ४५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला होता. त्यामुळे २४ तासांत येलदरी धरण १०० टक्के भरून ओव्हरफ्लो झाल्याने १२ ऑक्टोबर रोजी दुपारी धरणाचे दोन विद्युत टर्बाइन चालू करून विद्युतनिर्मितीद्वारे १ हजार ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात आला. परिणामी शंभर टक्के जलसाठा असलेल्या सिद्धेश्वर धरणाच्या पाणीपातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे १३ ऑक्टोबर रोजी धरणाचे ४ दरवाजे १ फुटाने उघडून ३ हजार २९० क्युसेक, तर सांडव्यावरून १ हजार ७५० क्युसेक असे एकूण ५ हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात आला.
नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचनायेलदरी व सिद्धेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप परतीच्या पावसाने हजेरी लावली नसली तरी खडकपूर्णा प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे दोन्ही धरणांत पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या २४ तासांत पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी झाल्यास विसर्गाच्या प्रमाणात मोठी वाढ होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने वर्तविली. त्यामुळे नदीपात्रातील पाणीपातळी वाढून पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, पूरप्रवण क्षेत्रातील नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.