लोकमत न्यूज नेटवर्कसवना : सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरी येथे एकाच रात्रीतून चार घरे फोडून कनेरगाव नाका येथील पेट्रोल पंपावरुन दुचाकी पळविल्याची घटना ५ मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकाराने मात्र वायचाळ पिंपरी व कनेरगाव नाका भागात एकच खळबळ उडाली आहे.मागील दोन महिन्यांपासून या भागात चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. शेतातील साहित्य पळविण्याचे प्रकार तर नेहमीचेच होऊन बसले आहेत. एवढेच नव्हे, चोरट्यांनी गुरांसाठी बांधून ठेवलेल्या वाळल्या भाकरीही नेल्या आहेत. शनिवारच्या मध्यरात्री वायचाळ पिंपरी येथे दत्तराव नथूजी वाबळे, काशीराम कडुजी गलंडे, भागवत गंगाराम वाबळे आणि विठ्ठल रामकिशन गलंडे या चौघांच्या घरांचे कुलूप तोडून घरातील डाळीसह भांडे कुंडे व कपडे अस्ताव्यस्त फेकून देत खुंटीला लटकून ठेवलेल्या पँट व शर्टमधील पैसे काढून नेले. तर इतर काही घरांत पैसे किंवा चोरीसारखी कोणती वस्तूच सापडली नसल्याने साहित्य रस्त्यावर फेकून दिले. तल कनेरगाव नाका येथील एका पेट्रोल पंपावरील सचिन श्यामराव पानपट्टे यांची दुचाकी पळविल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या ठिकाणी मात्र दुचाकी घेऊन जाणारा चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे कर्मचाऱ्यांतून बोलले जात आहे. या प्रकरणी कनेरगाव नाका चौकीत तक्रार दाखल केली असून, तपास पोकॉ. श्याम खुळे, सुनील खिल्लारे, मोहन धाबे, महाले हे करीत आहेत.
एकाच रात्रीत चार घरे फोडली; दुचाकीही लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 11:38 PM