तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी शासकीय रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता भासत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील १४ विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर मंडळींची शासकीय सेंटरमध्ये सेवा देण्यासाठी नियुक्ती करण्याचे आदेश काढले होेते. या आदेशामुळे शासकीय कोरोना सेंटरमध्ये तज्ज्ञ डॉक्टर मंडळी करून चांगली सेवा मिळेल, अशी अपेक्षा होती. १४ पैकी ८ डॉक्टरांना शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णांना सेवा देण्याची संधी दिली होती. यामध्ये डॉ. एम. आर. क्यातमवार, डॉ. डिग्रसे, डॉ. सेलूकर, डॉ. चेतन सातपुते, डॉ. मयूर सातपुते, डॉ. सागर सातपुते, डॉ. खराटे, डॉ. कऱ्हाळे, युवराज बेंडे, डॉ. सतीश कोंडावार, डॉ. वाघमारे, डॉ. मोरे, डॉ. सोमाणी, डॉ. मारडे यांचा समावेश आहे. या डॉक्टरांची सेवा सरकारी रुग्णालयातील रुग्णांना मिळणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचे स्वागत होत आहे. १६ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्तीचे आदेश काढले असले तरी अजून काही डॉक्टरांचा पाय शासकीय रुग्णालयाला लागले नाहीत. यानंतर लगेच जिल्हाधिकाऱ्यांनी पाच खासगी कोरोना सेंटरला मंजुरीचे आदेश काढले. यात त्या १४ खासगी डॉक्टरांपैकी चार डॉक्टरांचा समावेश आहे. यामध्ये डॉ. मयूर सातपुते, डॉ. चेतन सातपुते, डॉ. बाबासाहेब सेलूकर, डॉ. युवराज बेंडे यांचा समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी १४ डॉक्टरांची सेवा शासकीय रुग्णालयात देण्यासाठीचे आदेश काढले. त्यांच्या दवाखान्यात रुग्ण मोठ्या संख्येने दाखल असतात. या डॉक्टरांपैकी पाचजणांनी आपल्या खासगी कोरोना सेंटरसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केले होते. प्रस्ताव मंजुरीसाठी प्रलंबित असताना जिल्हाधिकाऱ्यांनी या डॉक्टरांची सरकारी रुग्णालयात सेवेसाठी नियुक्ती केली. नियुक्तीनंतर त्यांच्या खासगी कोरोना सेंटरला मंजुरीही दिली. त्यामुळे आता हे खासगी डॉक्टर सरकारी कोरोना सेंटरला सेवा देतील की, स्वत:चे खासगी कोरोना सेंटर सांभाळतील? हा मोठा प्रश्न आहे. रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा मिळावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी १४ डॉक्टरांची सरकारी रुग्णालयात नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. जिल्हाधिकाऱ्यांच्या दूरदृष्टीने चार डॉक्टरांची मात्र पंचाईत होणार आहे.
‘त्या’ १४ पैकी चार डॉक्टरांना खासगी कोरोना सेंटर मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 4:38 AM