हिंगोली: महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत जिल्ह्यात सहा खाजगी रुग्णालय जोडण्यात आली आहेत. असे असले तरी सहापैकी तीन रुग्णालयांना शासनाने कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची परवानी दिली आहे. यातही एकाच रुग्णालयाने तीन कोरोना रुग्णांवर उपचार केले आहेत, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
जिल्ह्यात कोरोना महामारीचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहून शासनाने जिल्ह्यातील तीन रुग्णालयांस कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी २३ एप्रिल २०२१ पासून परवानगी दिली. त्यानंतर तीन पैकी एका रुग्णालयाने ३ कोरोना रुग्णांवर उपचार केले आहेत. परवानगी मिळालेल्या दोन रुग्णालयाने कोरोना रुग्णांवर उपचार का केले नाही? त्यांच्याकडे रुग्ण आले की नाही? हाही प्रश्न अनुत्तरित आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय वसमत, उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी, ग्रामीण रुग्णालय औंढा,महिला रुग्णालय वसमत या सरकारी आरोग्य संस्था आणि योजनेशी जोडलेल्या सहा रुग्णालीयांपैकी तीनच रुग्णालयांना कोरोनावर उपचार करण्याची परवानगी दिली आहे.
सन २०१३ मध्ये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना नावाने सुरु झाली होती. त्यानंतर २०१६ मध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना या नावाने सुरु झाली आहे. या योजनेअंतर्गत जवळपास १ हजार ७२ आजार येतात. या सर्व आजारांसाठी दीड लाखापर्यंत शासनाकडून मोफत उपचार मिळतो. १ एप्रिल २० ते आजपर्यत या योजनेअंतर्गत एकूण जवळपास १ हजार ७३९ जणांनी कोरोनाव्यतिरिक्त रुग्णांनी नोंदणी करुन लाभ घेतला आहे. ज्यामध्ये नॉर्मल डिलेव्हरी ४४९ तर सिजेरीयन डिलेव्हरी ४०९ एवढी आहे.
दीड लाखांपर्यंत लाभ घेऊ शकता.....
या योजनेत शासनाकडून दीड लाख पर्यत लाभ मिळू शकतो. योजनेअंतर्गत १०७२ आजार येतात. ही योजना गरीबांसाठी लाभदायक अशीच अशीच आहे. जे गरीब आहेत,ज्यांची पैसा खर्च करण्याची ऐपत नाही, अशांसाठी ही योजना फायद्याची अशीच आहे.
अशी करा नोंदणी.....
गरीबांसाठी ही योजना शासनाने सुरु केली आहे. जिल्ह्यात या योजनेशी जोडल्या गेलेल्या कोणत्याही रुग्णालयात नोंदणी करता येते. आधार कार्ड किंवा स्वस्तधान्य कार्ड संबंधित दवाखान्यात दाखवावे. दोन्हीमध्ये रुग्णाचे नाव हे सारखे असणे गरजेचे आहे. तरच नोंदणीचा अर्ज हा पात्र ठरुन लाभ मिळू शकतो.
तर करा तक्रार....
खाजगी दवाखान्याबाबत काही तक्रार असल्यास आरोग्य मित्राशी अर्ज करावा. सरकारी दवाखान्याबाबत तक्रार असल्यास जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार करावी. सध्या शहरातील सरकारी व्यतिरिक्त तीनच खाजगी रुग्णालये या योजनेशी जोडलेली आहेत. रुग्णाने किंवा नातेवाईकांनी तक्रार केल्यास त्याची दखल घेतली जाते. या योजनेचा सर्वानी कागदपत्रे दाखवून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समन्वयक डॉ. मोहसीन खान यांनी केले आहे.
योजनेशी खाजगी दवाखाने जोडल्याचे माहितीच नाही.....
शासनाने गरीबांसाठी महात्मा फुले योजना सुरु केली असली तरी लाभ मात्र कमी लोकांनाच मिळतो. योजनेशी खाजगी दवाखाने जोडली गेली आहेत हे अनेकांना माहितीही नाही. याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे.
खाजगी दवाखान्याला शासन पैसे देत असले तरी नियमात बसले तरच हे रुग्णालये नोंदणी करुन घेतात. काही रुग्णांना शहरातील खाजगी रुग्णालय जवळ आहेत म्हणून ते त्याकडे जातात, विचारणा करतात,परंतु, हे रुग्णालय तुम्ही काहीही करा, नियमात बसले तरच रुग्णांवर उपचार केले जातील, असे सांगतात, अशा रुग्णांच्या तसेच नातवाईकांच्या तक्रारी आहेत.
योजनेशी जोडलेली जिल्ह्यातील रुग्णालये ११
एकूण कोरोना बाधीत १४८९५
एकूण कोरोनामुक्त १४०४३
आतापर्यत झालेले मृत्यू ३१४
सध्या उपचार सुरु असलेले रुग्ण ५३८
योजनेचालाभ घेतलेले रुग्ण ०३