फवारणी करण्याची मागणी
औंढा नागनाथ: शहरातील मुख्य रस्ता, तसेच मंदिर परिसरातील नाल्यांवर महिनाभरापासून फवारणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे या भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. स्वच्छता विभागाने याची दखल घेऊन नाल्यांवर फवारणी करणे गरजेचे आहे.
वन विभागाचे दुर्लक्ष
कळमनुरी: ग्रामीण भागात वानरांनी उच्छाद मांडला असून, पालेभाज्यांची नासाडी वानरे करीत आहेत. यामुळे पालेभाज्या उत्पादक जाम वैतागले आहेत. वेळोवेळी वन विभागाला सांगूनही वनविभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. वरिष्ठांनी याची दखल घेऊन वानरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
नळाला पाणी वेळेवर येईना
कळमनुरी: गत पंधरा-वीस दिवसांपासून शहरातील नळांना पाणी वेळेवर येईना झाले आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी ताटकळत बसावे लागत आहे. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने उन्हाची तीव्रता लक्षात घेता नळांना पाणी वेळेवर सोडावे, अशी मागणी नळधारकांनी केली आहे.
वाडी-तांड्यांवर पाणीटंचाई
औंढा नागनाथ: तालुक्यातील वाडी-तांड्यांवर पंधरा दिवसांपासून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी कोसो दूर भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. तालुका प्रशासनाने दखल घेऊन वाडी-तांड्यावर पिण्याच्या पाण्याचे टँकर पाठवावे, अशी मागणी पुढे येत आहे.