हिंगोली : आर्थिक देवाण-घेवाणीवरून २५ वर्षीय युवकाचा खून करून काही घडलेच नाही, असे दाखवत आरोपीही युवकाचा शोध घेत होता. मात्र पोलिसांनी काही तासातच खूनाच्या घटनेचा उलगडा करीत आरोपीस बेड्या ठोकल्या. ही घटना हिंगोली शहरातील खटकाळी बायपास भागाकडील रेल्वे पटरी परिसरात २८ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.
अरबाज खॉ असिफ खॉ पठाण (वय २५ रा.आजम कॉलनी, हिंगोली) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. हिंगोली शहरातील रेल्वे पटरीजवळ एका युवकाचा खून झाल्याची माहिती हिंगोली शहर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पथकाने घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. या वेळी अरबाज खॉ यांचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. गळ्यावर व छातीवर वार करून खून करण्यात आल्याचे दिसत होते. या घटनेनंतर पोलिसांनी मारेकऱ्याचा शोध घेण्यास सुरूवात केली.
परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करीत काही सुगावा लागतो का याचा शोध सुरू केला. त्यानुसार एका बारच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अरबाज खॉ यांच्या सोबत त्याचा मित्र ईमरोज खान आयुब खान पठाण (रा. आजम कॉलनी, हिंगोली) हा असल्याचे दिसत होते. त्यावरून पथकाने ईमरोज खान यास ताब्यात घेतले. या प्रकरणी आफरोज खान आसिफ खान पठाण यांच्या फिर्यादीवरून ईमरोज खान आयुब खान पठाण याचेविरूद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पैशाच्या देण्याघेण्याच्या कारणावरून चाकूने गळा कापून व पोटात चाकूने वार करून खून केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक एच.एम. मांजरमकर तपास करीत आहेत.
नातेवाईकांसोबत आरोपीही घेत होता शोधदरम्यान, अरबाज खॉ व ईमरोज खान यांच्यात काही दिवसांपूर्वी पैसे देणे-घेण्यावरून बाचाबाचीही झाली होती. त्यानंतर २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता ईमरोज हा अरबाज यांना सोबत घेऊन गेला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत अरबाज खॉ हे घरी आले नव्हते. त्यामुळे कुटूंबियांनी ईमरोज यास विचारणाही केली. मात्र त्याने मला सात वाजता नांदेड नाका येथे सोडून अरबाज खॉ निघून गेल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर रात्री उशिरा तोही काही घडलेच नाही असे दाखवत कुटूंबियासोबत अरबाज खॉ यांचा शोध घेत होता. मात्र सीसीटीव्ही फुटेजने त्याचे बिंग फुटले अन तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.