लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जि.प.च्या समाजकल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या दलित वस्ती सुधार योजनेतील २६ कोटी रुपयांच्या नियोजनात सतराशे विघ्न येत होते. मागील सहा महिन्यांपासून चर्चेत असलेल्या या निधीच्या गावनिवडीसह वस्तीनिहाय निधी वितरणाचा आदेश अखेर निघाला.यंदा दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीवरून मंजुरीपासूनच सदस्यांमध्ये वाद सुरू होते. समितीमध्ये केवळ नियोजनाचा ठराव तेवढा घेतला. त्यानंतर प्रत्यक्षात नियोजन व आदेश निघण्याची प्रतीक्षाच होती. प्रत्येक सर्कलमध्ये किती द्यावयाचा, समितीवरील सदस्यांना किती झुकते माप द्यायचे, पदाधिकाºयांनी सुचविलेल्या कामांना किती तोलायचे हे ठरत नसतानाच पालकमंत्र्यांनीही शिफारसी केल्यानंतर या प्रक्रियेतील वादाला फोडणी बसली होती. त्यामुळे अनेक दिवस सदस्यांतील वादावादी सुरूच होती. निधी नियोजनाचे गणित बसायलाच तयार नव्हते. सदस्य व पदाधिकाºयांतही यावरून एकमत होत नव्हते. अखेर त्यांच्यात एकमत झाले तर पालकमंत्र्यांनी दिलेल्या शिफारशींचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच पुन्हा सर्व सदस्यांना विश्वासात घ्यावे लागले. काहींनी तर सभा घेवून हा प्रकार फेटाळण्याची तयारी केली होती. तर काहींनी यात खोडा येण्यापेक्षा एकदाची मंजुरी देवून पुन्हा अशा बाबी येणार नाहीत, याचे नियोजन करण्याचा सल्ला देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. हे सगळे करत असताना विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागली अन् सगळी जुळवाजुळव झालेली असताना प्रक्रिया ठप्प झाली होती. त्यामुळे आचारसंहिता संपल्यावर पुन्हा हालचाली गतिमान झाल्या. मागील पंधरा दिवसांत प्रक्रिया पूर्ण करून अखेर आदेश काढले आहेत.दलित वस्ती सुधार योजनेत ४0१ गावांतील ५८७ वस्त्यांना २५.९८ कोटींच्या निधीचे वितरण केले. यात हिंगोली तालुक्यातील १0२ गावांत १४८ वस्त्यांमध्ये ५.८0 कोटी, कळमनुरी तालुक्यातील ७१ गावांतील १0३ वस्त्यांमध्ये ५.0१ कोटी, वसमत तालुक्यातील ९६ गावांतील १३८वस्त्यांमध्ये ६.२१ कोटी, औंढा तालुक्यातील ५२ गावांत ८५ वस्त्यांमध्ये ३.३७ कोटी तर सेनगाव तालुक्यातील ८0 गावच्या ११३ वस्त्यांमध्ये ५.५६ कोटींचा निधी वितरित केला आहे. सर्वाधिक वसमत तर कमी औंढ्यात निधी मिळाला.दलित वस्ती सुधार योजनेतील कामांची यादी जाहीर झाल्याचे कळताच आज जि.प.त सदस्यांची गर्दी वाढली होती. यादीत नावे तपासायची म्हटले तर याद्या पं.स.ला गेल्याचे सांगितले जात होते.
५८७ वस्त्यांना निधीचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 11:28 PM