हिंगोली : जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापतिपदाच्या निवडीसाठी २२ जुलैला विशेष सभा होणार असून, अजूनही यासाठी कुणाचेच नाव निश्चित झाले नाही. केवळ चर्चाच रंगत आहेत.
जि.प.च्या शिक्षण सभापतिपदासाठी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तीन पक्षांनी मिळून एक नाव निश्चित करायचे आहे. मागच्या वेळी पक्षाशी बंड पुकारून रत्नमाला चव्हाण यांनी स्वसामर्थ्यावर हे पद बळकावले होते. मात्र, नंतर त्यांना पायउतार व्हावे लागले. मागच्या वेळी झाल्याप्रमाणे आताही प्रकार घडू नये, यासाठी राष्ट्रवादीची सावध भूमिका आहे. त्यामुळे अजून कुणाचेच नाव पुढे केले नाही. पक्षनेत्यांकडे काहींची शिष्टमंडळे जाऊन आली आहेत. मात्र, आणखी बराच काळ बाकी असल्याने तिन्ही पक्षांत चर्चा झाली नसल्याचे दिसत आहे. सध्या यशोदा दराडे, संजय कावरखे, रिता दळवी यांची नावे चर्चेत असली तरीही काँग्रेसकडूनही नाव पुढे करण्याची तयारी चालू झाली आहे. कैलास सोळुंके यांचे नाव पुढे करण्याची चाल खेळली जाण्याची शक्यता आहे. मागच्यावेळी काँग्रेसकडे असलेले हे पद ऐनवेळी राष्ट्रवादीकडे गेल्याने काँग्रेसमधूनही दबक्या आवाजात हे पद मागण्याची तयारी सुरू आहे. मात्र, यावर फारसा विचार होईल, असे दिसत नाही. या गटाची मदत मात्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यावेळी काही दगाफटका होणार नाही, याची काळजी उमेदवार देणाऱ्या पक्षनेतृत्वाला घ्यावी लागणार आहे. भाजपची काही मंडळी गणित बिघडते काय? हे पाहण्यासाठी तशी सज्जच आहे. तसेही जि.प.त सध्या बहिष्कृत म्हणूनच जगणे नशिबी आल्याने यातून तरी काही भाव मिळते काय? याची त्यांना आस आहे.