वसमत (जि. हिंगोली) : भावी न्यायाधीशाने साखरपुडा झाल्यानंतर अचानक १५ लाख रुपये, २० तोळे सोने, इनोव्हा गाडीसाठी लग्न मोडल्याचा प्रकार येथे घडला आहे. वधूपित्याने या भावी न्यायाधीशाविरुद्ध वसमत पोलिसांत तक्रार नोंदविल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे.सोयरीक जमली तेव्हा मी वकील होतो, आता मी न्यायाधीशपदाची परीक्षा पास झालो आहे. लवकरच न्यायाधीश होणार आहे. त्यामुळे माझा रूबाब वाढला आहे. आता मला अधिक हुंडा पाहिजे अन्यथा मी लग्न करणार नाही, असे सांगत शेख फयाजोद्दीन शेख खाजा या वकिलाने लग्न मोडले. वसमत येथील शेख साबेर इब्राहिम यांच्या मुलीसोबत त्याचा विवाह ठरला होता. वधूपित्याने साखरपुड्यातच ३ लाख रुपये खर्च केला होता.लग्नाची तारीख ठरविण्यासाठी विचारणा केल्यावर मुलगा न्यायाधीशपदाची परीक्षा देत आहे. निकालानंतर लग्नाची तारीख काढू, असा निरोप मध्यस्थांमार्फत वधूपित्याला मिळाला. फेब्रुवारीत शेख फयाजोद्दीन न्यायाधीशपदाची परीक्षा उत्तीर्ण झाला. मात्र नंतर मध्यस्थांनी मुलाने केलेल्या मागणीची यादी वधूपित्यासमोर ठेवली अन् त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. हुंड्याच्या मागणीचे रेकॉर्डिंगही वधूपक्षाकडे आहे. शहरातील प्रतिष्ठितांनी मध्यस्थी करून मुलास समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रयत्न निष्फळ ठरले.
भावी न्यायाधीशाने हुंड्यासाठी मोडले लग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 5:50 AM