औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : औंढा पंचायत समितीच्या सभापती संगीता ढेकळे यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता धाड टाकून उपसभापती, दोन पं.स. सदस्यांसह ११ जणांना पकडले. पोलिसांनी येथून रोख रकमेसह २ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
औंढा नागनाथ येथे पंचायत समितीच्या कॅम्पस्मध्ये सभापती, कर्मचारी व अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. विद्यमान सभापती संगीता ढेकळे यांच्या निवासस्थानी मोकळ्या जागेत जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंढे यांना मिळाली. त्यांनी जमादार अफसर पठाण, जमादार गणेश नारोटे, पंजाब थिटे, बंडू घुगे, इकबाल शेख, ज्ञानेश्वर गोरे, अमोल चव्हाण, खिजर पाशा यांना सोबत घेऊन धाड मारली. यावेळी शिवसेनेचे उपसभापती भीमराव कºहाळे, पं.स. सदस्य बालाजी बोडखे, भगवान कदम, तसेच पंडित लोणसाने, गजानन नागरे, निवृत्ती कदम, मुंजाजी टोम्पे, विजय वाघमारे, राजेश्वर गारकर, तुकाराम गायकवाड, राजेश चव्हाण या अकरा जणांना जुगार खेळताना पकडले. तर एक जण फरार झाला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
शासकीय निवासस्थानात जुगाऱ्यांना आश्रय यापूर्वी पुढाऱ्यांच्या शेतात, आखाड्यावर धाड पडल्याचे प्रकार घडले. मात्र, आज पहिल्यांदाच पंचायत समिती सभापतींच्या निवासस्थानी पदाधिकारी व सदस्य जुगार खेळताना आढळून आले. सोमवारी या कार्यालयातील एक कर्मचारी कोरोनाबाधित असल्याने हे कार्यालय तीन दिवसांसाठी बंद केले आहे. हा भाग प्रतिबंधित केला आहे. त्याचा फायदा घेत हा प्रकार राजरोसपणे सुरू होता. एरवीही पदाधिकारी कुटुंबियांसह येथे राहत नसल्याने जुगार व मद्य प्राशन नित्याचेच असल्याचे काहींनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.