लोकमत न्यूज नेटवर्कजवळा बाजार : वसमत तालुक्यातील आडगाव रंजे शिवारामध्ये १५ सप्टेंबर रोजी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास जुगार खेळ सुरू असल्याची गोपनीय माहिती हट्टा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी कारवाई करून ८ दुचाकी, दोन मोबाईल व रोख २१७० रुपये जप्त केले. या प्रकरणी रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला.आडगाव रंजे येथील चिखली रस्ता या भागातील एका शेतामध्ये जुगार खेळ सुरू होता. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच हट्टा ठाण्याचे सपोनि गुलाब बाचेवाड, बबन राठोड, गणेश लेकुळे, इम्रान सिद्दीकी, राजू गुठ्ठे, प्रभाकर भोंग, होमगार्ड शंकर चव्हाण पथकाने छापा मारला. जुगार खेळणाऱ्या अनेकांनी धुम ठोकली.या प्रकरणी जमादार बबन राठोड यांच्या फिर्यादीवरून आरोपी संतोष चव्हाण, गजानन विठ्ठल चव्हाण, विनायक काळे, सुंदर उत्तमराव काळे, त्र्यंबक भालेराव व इतर दहा ते पंधराजणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून ३ लाख १० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अनेकांची वाहने ठाण्यात लावण्यात आली आहेत. पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या आदेशावरून जिल्ह्यात अवैध धंद्याविरूद्ध मोहीम सुरू आहे. आडगाव रंजे येथे मात्र मोबाईल मटका सुरू असून यावर हट्टा पोलीस कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जुगार अड्ड्यावर धाड, ८ दुचाकी, मोबाईल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:06 AM