सेनगाव: ‘गण गण गणात बोते, हे भजन श्रीहरीचे’ असा जयघोष करीत सेनगाव व पानकनेरगावसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी पायी दिंडी पालखीचे स्वागत केले. दोन वर्षांच्या खंडानंतर प्रथमच श्री संत गजानन महाराज पालखीचे आगमन मराठवाड्यात झाले आहे.
१६ जून रोजी पानकनेरगाव व सेनगाव येथे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. ‘गण गण गणात बोते’ चा जयघोष पायी दिंडीदरम्यान सुरू होता. श्री गजानन महाराजांच्या पालखीचे गुरुवारी सकाळी ७ वाजता रिमझिम पावसाच्या सरीमध्ये तालुक्यातील पानकनेरगाव आगमन झाले. आषाढी यात्रेकरिता पंढरपूरकडे श्री गजानन महाराज पालखीचे रवाना होत आहे. १६ जून रोजी सकाळी ७ वाजता पानकनेरगाव येथे आगमन झाले. विदर्भातील श्रीक्षेत्र शेगाव येथून मागील पाच तपापासून जाणाऱ्या पालखीचे हे ५५ वे आहे. पालखी सोहळ्यात ६५५ वारकरी, ३ आश्व, ९ वाहनांसह मराठवाड्यात सकाळी ७ वाजता आगमन झाले.
कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर आगमन होत असल्याने भाविकांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला. पालखीचे स्वागत करण्यासाठी सरहद्दीवर तालुक्यातील पानकनेरगाव, वाढोणा, खैरखेडा आदी गावांतील भाविकाांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी ‘श्री’ च्या दर्शनासाठी आ. तान्हाजी मुटकुळे, पोलीस निरीक्षक रणजित भोईटे यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पालखीमध्ये सहभागी वारकऱ्यांच्या चहापाणी, फराळाची सेनगाव ते रिसोड रस्त्यावर जागोजागी व्यवस्था केली होती. सायंकाळी ६ वाजता पालखी सेनगाव शहरात दाखल झाली. या दरम्यान, पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. जि. प. प्रशालेच्या मैदानावर रांगेत दर्शन घेतले. सेनगाव शहरात पालखी मुक्कामी होती.