१० सप्टेंबर रोजी शहरासह शहर व जिल्ह्यात ‘श्री’ची विधिवतपणे स्थापना करण्यात आली. कोरोना महामारीमुळे शासनाच्या आदेशानुसार साध्या पद्धतीने कार्यक्रम घेण्यात आले. अनेक गणेश मंडळांनी सकाळ, सायंकाळी आरती करत धार्मिक कार्यक्रम, तर काही गणेश मंडळांनी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा घेण्यात आल्या. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गणपती विसर्जनासाठी २० सप्टेंबर रोजी शहरात ६ कृत्रिम तलाव तर २ फिरते कुंड तयार करण्यात आले होते. याचबरोबर चिरागशहाबाबा, कयाधू नदी, जलेश्वर तलाव येथेही विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली होती.
गणपती विसर्जनासाठी कुठेही गर्दी होऊ नये म्हणून नगर परिषदेच्या वतीने आदर्श महाविद्यालयाजवळील पाण्याच्या टाकी, शिवाजीनगर येथील दत्त मंदिर, एनटीसी मील परिसर, अग्निशमन कार्यालय, न. प. नवीन इमारत येथे कृत्रिम तलाव करण्यात आले होते. शहरातील सर्वच कृत्रिम तलावाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. गणेश नामाचा गजर करत ‘श्री’ गणरायाचे भाविकांनी कृत्रिम तलावात विसर्जन केले.