गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगले कोपरे
हिंगोली: येथील जिल्हा परिषदेत दररोज शेकडो नागरिकांची ये-जा असते. तसेच कर्मचाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मात्र काही दिवसांपासून गुटखा खाऊन कार्यालयात येणाऱ्या कर्मचारी, नागरिकांची संख्या वाढत आहे. गुटखा, तंबाखू खाऊन कुठेही थुंकले जात असल्याने पायऱ्यांचे कोपरे रंगले आहेत. त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होत असून गुटखा खाणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
मुख्य रस्त्यावर होतेय अतिक्रमण
हिंगोली: शहरातील काही मुख्य रस्त्यावर दुकानदार दुकानातील साहित्य ठेवत आहेत. दुकानाच्या पुढे साहित्य ठेवले जात असल्याने रस्ता अरूंद होत आहे. नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण धारकांवर कारवाई केली जात असली तरी कारवाईचे पथक आल्यानंतर रस्त्यावर ठेवलेले साहित्य पुन्हा दुकानात ठेवले जात आहे. पथक गेल्यानंतर अतिक्रमण जैसे थे होत आहे. त्यामुळे रस्त्यावर साहित्य ठेवणाऱ्या दुकानदारावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
जिल्हा रूग्णालय परीसरात स्वच्छतेची गरज
हिंगोली: शहरातील जिल्हा रूग्णालयात जिल्हाभरातून रूग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे हा परिसर दिवसभर गर्दीने फुलून जातो. रूग्णालयात् स्वच्छता नियमित असली तरी रूग्णालयाच्या बाहेर मात्र स्वच्छता नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रूग्णालयाच्या बाहेर बसणाऱ्या रूग्णांच्या नातेवाईकांना याचा त्रास होत आहे. रूग्णालय परीसरातही स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज असल्याचे मत नातेवाईकांतून व्यक्त होत आहे.