विरुद्ध दिशेने वाहतूक सुरूच
हिंगोली: शहरातील गांधी चौक, महावीर चौक, बस स्थानक परिसर, नांदेड नाका आदी भागांत विरुद्ध दिशेने वाहतूक सुरूच आहे. या प्रकारामुळे वाहतूक खोळंबून जात आहे. वेळोवेळी संबंधित विभागाला सांगण्यात आले, परंतु अद्याप तरी कोणीही लक्ष दिलेले दिसत नाही. शहर वाहतूक शाखेने याची दखल घेऊन विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक बंद करावी, अशी मागणी होत आहे.
मिरचीवर औषध फवारणी करावी
हिंगोली: मिरची पिकामध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास, त्याच्या व्यवस्थापनासाठी मायक्लोब्युटनील १० टक्के डब्लूपी १० ग्राम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मिरची, भाजीपाला पिकामध्ये रसशोषण करणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास, व्यवस्थापनासाठी पायरीप्राॅक्सिफेन १० टक्के ईसी ४ मिली किंवा फेनप्रोपाथ्रीन १० टक्के ईसी ४ मिली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असा सल्ला ‘वनामकृ’ विद्यापीठाने दिला आहे.
दारेफळ येथे नामविस्तार दिन साजरा
करंजी : वसमत तालुक्यातील दारेफळ येथे नामविस्तार दिन साजरा करण्यात आला. यावेळी सदानंद गजभारे, उतम जाधव, लक्ष्मण बारहाते, रोहिदास वंजारे, रामचंद्र भुजबळ, श्रीकांत बारहाते, दलित गायकवाड, गंगाधर वंजारे, चंपती भुजबळ, केशव भुजबळ, बालासाहेब बारहाते यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडाबाळापूर गावासह परिसरातील अनेक गावांमध्ये मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. शेतातील विहिरींना या वर्षी चांगले पाणी आहे, परंतु वीज खंडित होत असल्यामुळे पाणी पिकांना देता येत नाही. परिणामी, पिके वाळून जात आहेत. महावितरण कंपनीने या बाबीची दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.
‘रेल्वे उड्डाण पुलावर दुभाजक करावे’
हिंगोली: शहरातील रेल्वे उड्डाण पुलावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. या ठिकाणावरून वाहने वेगाने जात आहेत. रेल्वे उड्डाण पुलावर मागणी करूनही दुभाजक बसविण्यात आलेले नाही. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे, तसेच पुलावर कोठेही गतिरोधकही बसविण्यात आले नाही. संंबंधित विभागाने याची दखल घेऊन दुभाजक व गतिरोधक बसवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बस स्थानकात धुळीचे प्रमाण वाढले
हिंगोली: शहरातील बस स्थानकात मागील काही महिन्यांपासून धुळीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रवाशांना अतोनात त्रास होत आहे. धुळीबरोबरच स्वच्छतागृहाची दैनावस्था झाली आहे. वेळोवेळी संबंधित विभागाला सांगण्यात आले, परंतु अद्याप तरी कोणत्याही अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेले दिसत नाही. बस स्थानकातील धुळीचे प्रमाण कमी करून प्रवाशांसाठी सोईसुविधा निर्माण करून द्याव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
नाल्यांवर औषध फवारणीची मागणी
हिंगोली: शहरातील जिजामातानगर, कापड गल्ली, मंगळवारा, पेन्शनपुरा, तोफखाना, कमलानगर, सिद्धार्थनगर, इंदिरानगर आदी नगरांतील नाल्या वेळेवर साफ होत नसल्यामुळे पाणी रस्त्यावर येत आहे. परिणामी, डासांचा प्रमाण वाढत आहे. नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने याची दखल घेऊन नाल्यांची साफसफाई करून औषधाची फवारणी करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांंनी केली आहे.