हिंगोली : घरगुती वापराचे गॅस सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे आता ८८५ रुपये ५० पैसे माेजावे लागणार आहेत. गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतीने स्वयंपाक घरातील बजेट कोलमडले असून महागाईने नागरिक त्रस्त झाले आहेत.
पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने अगोदरच सर्वच जण मेटाकुटीला आले आहेत. इंधर दरवाढीने महागाईत भर पडत असून महिन्याचे बजेट कोलमडत आहे. आता गॅस सिलिंडरचे दरही तब्बल २५ रुपयांनी वाढले आहेत. मार्च एप्रिल महिन्यात केवळ दहा रुपये कमी करून दिलासा देण्याचा प्रयत्न झाला. मात्र, हा दिलासा फार काळ टिकला नाही. लगेच जुलै महिन्यात गॅस सिलिंडरचे दर ८६० रुपये ५० पैसे करण्यात आले. आता थेट २५ रुपयांची वाढ करण्यात आली असून घरगुती वापराचे सिलिंडर ८८५ रुपये ५० पैशांना घ्यावे लागणार आहे. कोरोनामुळे अगोदरच त्रस्त असलेल्या नागरिकांचे गॅस सिलिंडरच्या दरवाढीने डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अनेकांनी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करणे सुरू केल्याचे दिसून येत आहे.
सबसिडी बंद, दरवाढ सुरूच
गॅस सिलिंडरवर जवळपास मे २०२० पासून सबसिडी मिळणे बंदच झाले आहे. सबसिडीमुळे गरिबांना दिलासा मिळत होता. मात्र, सबसिडी बंदच झाल्यात जमा आहे. हिंगोली शहरातील एका गॅस वितरकाकडे विचारणा केली असता सध्या ९ रुपये ४५ पैसे सबसिडी जमा होत असल्याचे सांगण्यात आले. या महिन्यात तर ही रक्कमसुद्धा जमा झाली नसल्याचा आरोप होत आहे. एकीकडे सबसिडी जवळपास बंद झाली असताना गॅस सिलिंडरचे दर मात्र झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहेे.
व्यावसायिक सिलिंडर ४ रुपयांनी स्वस्त
जिल्ह्यात व्यावसायिक सिलिंडर यापूर्वी १६९५ रुपयांना मिळत होते. आता यात ४ रुपयांनी घट झाली असून १६९१ रुपयांना गॅस सिलिंडर मिळणार आहे. व्यावसायिकांना थोडासा दिलासा मिळणार असला तरी घरगुती वापराचा गॅस सिलिंडर महागल्याने सर्वसामान्यांना याचा फटका बसणार आहे.
अगोदरच कोरोनामुळे रोजगार मिळणे अवघड बनले आहे. त्यात गॅस सिलिंडरचे दर वाढत असल्याने पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. धुरामुळे डोळ्याचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- रत्नमाला मोरे
शासन एकीकडे सर्वांनी गॅस वापराबाबत जनजागृती करीत आहे. तर दुसरीकडे गॅस सिलिंडरचे दर वाढवीत आहे. त्यामुळे घरखर्च भागविताना मोठी कसरत करावी लागत आहे. शासनाने गॅस सिलिंडरचे दर कमी करावेत.
- नंदा कान्हेड