हिंगोली : शहरातील नाईकनगर भागातील घराच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्याची घटना ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास घडली. या आगीत स्वयंपाक घरासह इतर साहित्य जळून खाक झाले आहे. ही आग गॅस गळतीमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर आग लागल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
शहरातील नाईकनगरातील लीना संदेश मुक्कीवार यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावरील स्वयंपाक घराला अचानक आग लागल्याची घटना घडली. ही माहिती अग्निशमन विभागाला कळविण्यात आल्यानंतर नगरपालिकेचे अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल झाले. परंतु, काही क्षणातच आग भडकल्याने संपूर्ण घरातून धुराचे लोट बाहेर येत होते. आगीची तीव्रता पाहता न.प. मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी कळमनुरी न.प.च्या अग्निशमन दलासही पाचारण केले. त्यानंतर सुमारे एक तासाने आग आटोक्यात आली.
या घटनेत स्वयंपाक घरातील साहित्यासह फ्रीज, इतर खोल्यांमधील फर्निचर, कपडे आदी साहित्य जळून खाक झाले आहे. यात सुमारे ५ ते ७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. आग लागली तेव्हा घरात सदस्य उपस्थित होते. परंतु, सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन विभाग प्रमुख भागवत धायतडक, बाळू बांगर, बजरंग थिटे, दिलीप दोडके, संजू गायकवाड, शेख अमजद आदींनी परिश्रम घेतले.