गौरी- गणपतीने यंदाही सोबत आणले वरुणराजाला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:52 AM2018-09-18T00:52:40+5:302018-09-18T00:53:07+5:30
तालुक्यातील काही भागात महिन्याभरापासून दांडी मारलेल्या पावसाने ऐन गौरी- गणपतीच्या सणासुदीत पुनरागमन केले असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र उन्हामध्ये होरपळलेल्या पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : तालुक्यातील काही भागात महिन्याभरापासून दांडी मारलेल्या पावसाने ऐन गौरी- गणपतीच्या सणासुदीत पुनरागमन केले असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र उन्हामध्ये होरपळलेल्या पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.
तालुक्यात महिन्याभरापासून पावसाने चांगलीच दांडी मारली. पोळ्याला पाऊस पडतो मात्र यंदा पोळ्यातही पावसाने हुलकावणी दिली. दिवसेंदिवस पडणाºया कडक उन्हामुळे ऐन शेंगा भरणीमध्ये आलेले सोयाबीनचे पीक धोक्यात आले होते. यामध्ये माळरानावरील पिके अर्ध्यावरच जळून गेली आहेत. या अगोदर अधिक पावसामुळे कापसाची पिके उन्मळून गेली होती. त्यातच सोयाबीनही करपून गेले. सध्या शिल्लक राहिलेले सोयाबीन पाणी नसल्याने शेवटची घटिका मोजत असतानाच ऐन महालक्ष्मीच्या सणात तालुक्यातील काही गावांत पावसाने शनिवारपासूनच हजेरी लावली. रविवारीदेखील सकाळी ११ ते दुपारी १.३0 च्या सुमारास विविध भागात पाऊस पडल्याने शेतकºयांना याचा मोठा दिलासा मिळाला आहे. एक महिन्यांपासून पाऊस नसल्यामुळे अनेक ठिकाणच्या खडकाळ जमिनीवरील सोयाबीन होरपळून गेले. तर काही ठिकाणी शेंगाच भरल्या नव्हत्या.
या पावसामुळे सोयाबीन पिकाला जीवदान मिळाले आहे. पाऊस नसल्यामुळे शेतकरी ठिबक व तुषारच्या मदतीने कापूस व हळद ही ीपके वाचविण्याच्या प्रयत्नामध्ये होती. मात्र या दमदार पावसामुळे चांगलाच दिलासा मिळाल्यामुळे शेतकरीवर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र अर्ध्या तालुक्यावर पावसाची अवकृपा कायम असून हे शेतकरी देवाला प्रार्थना करीत आहेत.
जवळा बाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजारसह परिसरामध्ये सोमवारी दुपारी १२.३० ते १.३० वाजण्याच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. एक महिन्याच्या खंडानंतर पाऊस झाल्याने शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जवळा बाजारसह परिसरामध्ये सोमवारी दुपारच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. असोला, कोंडशी, जवळा बाजार, पुरजळ, बाराशिव, करंजाळा आदी परिसरामध्ये हजेरी लावली. या पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर, हळद या पिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. तब्बल महिनाभराच्या खंडानंतर हा पाऊस झाला.