लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागासाठीच्या विविध घरकुल योजना शासकीय, प्रशासकीय अडचणींत अडकून पडल्या आहेत. त्यामुळे लाभार्थी हैराण असून काहींना तर कडाक्याच्या थंडीतही उघड्यावरच संसाराचा गाडा हाकावा लागत आहे.प्रधानमंत्री आवास योजनेत ग्रामीण भागासाठी गतवर्षी ३७१५ घरकुलांना मंजुरी मिळाली होती. त्यापैकी पूर्ण झालेल्या घरकुलांची संख्या केवळ ७३१ आहे. या घरकुलांची कामे पूर्ण न होण्यामागे एकमेव कारण म्हणजे निधीच मिळत नसल्याचे लाभार्थ्यांचे म्हणने आहे. यातील लाभार्थ्यांची कामे झाल्याप्रमाणे त्या-त्या टप्प्यावर तीन हप्त्यात निधी वितरित केला जातो. अनेकांना बँक खातेक्रमांक चुकल्याने पहिला हप्ता मिळण्यातच अडचणी झाल्या. आता ही अडचण दूर केली तरीही निधी मिळत नसल्याचेच दिसून येत आहे. त्यातच स्टेट बँक आॅफ हैदराबाद आता स्टेट बँक आॅफ इंडिया झाली आहे. त्यामुळे त्यांच्या आयएफएससी कोडची समस्याही निर्माण झाल्याचे सांगितले जाते. काहींचे जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते आहेत. त्यांनाही मोठी अडचण येत आहे. त्यामुळे कधी नव्हे, एवढ्या घरकुल लाभार्थ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. तर अभियंत्यांकडून या कामांचे वेळेत मूल्यांकन केले जात नाही. शिवाय कामाचे छायाचित्र अपलोडींगही मंद गतीने होत असल्याने लाभार्थ्यांना वेळेत अनुदान मिळत नाही, अशाही तक्रारी वाढल्या आहेत.या योजनेत गतवर्षी औंढा ६५४, वसमत-६७५, हिंगोली-६३१, कळमनुरी-९९४, सेनगाव-७६१ अशी घरकुलसंख्या होती. त्यापैकी ७३१ पूर्ण झाले. उर्वरित २९८४ कामे मार्च एण्डपर्यंतही पूर्ण होणे शक्य दिसत नाही. यंदा तर अवघ्या १0४७ घरकुलांना मंजुरी मिळालेली आहे. मार्च एण्ड जवळ येत असला तरीही कामेच सुरू नसल्याचे चित्र आहे.शहरी भागाचीही बोंबचसर्वांसाठी घरे या ब्रिदघोषाखाली शहरी भागातील प्रधानमंत्री आवास योजनेत २0२२ पर्यंत प्रत्येकाला घर मिळावे, अशी योजना आखण्यात आली आहे. यात हिंगोलीत ३१२५ एवढे एकूण उद्दिष्ट असून यंदा ३१२ मंजूर झाले. त्यापैकी २00 जणांचा प्रस्ताव म्हाडाकडे गेला असला तरीही काहीच नाही. वसमतला २७११ एवढे एकूण उद्दिष्ट असून कळमनुरी नगर परिषदेसह औंढा व सेनगाव नगर पंचायतीसाठी ९९२ एकूण घरकुलांचे उद्दिष्ट आहे. त्यात वसचमतला २७१ तर इतरांना ९९ एवढे यंदाचे उद्दिष्ट आहे. यात अजून संबंधितांचे विकास आराखडेच तयार नसल्याने पुढील प्रक्रियेचा प्रश्नच नाही.
हिंगोली जिल्ह्यात निधीअभावी घरकुल लाभार्थी हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:03 AM
जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागासाठीच्या विविध घरकुल योजना शासकीय, प्रशासकीय अडचणींत अडकून पडल्या आहेत. त्यामुळे लाभार्थी हैराण असून काहींना तर कडाक्याच्या थंडीतही उघड्यावरच संसाराचा गाडा हाकावा लागत आहे.
ठळक मुद्देकुठे बँकांची, तर कुठे प्रशासकीय अडचण