हिंगोली : हुंडा मागणी प्रथेला पायबंद बसावा, यासाठी कडक कायद्याची निर्मिती झाली असली, तरी कायद्याला न जुमानता पैसे अथवा साहित्याच्या रूपाने हुंडा मागितला जात आहे. लग्नानंतरही राहिलेला हुंडा मागणाऱ्यांची संख्या कमी नाही. त्यामुळे लग्न करताना नवऱ्यामुलाला जणू मुलीचे वडील हुंडा रूपाने विकतच घेत आहेत.
हुंडा देणे घेणे गुन्हा असला तरी हुंडा दिल्याशिवाय लग्न जुळत नसल्याचे वास्तव आहे. मुलीचा सुखी संसार पाहून मुलीचे आई-वडील उधारी उसनवारी वेळप्रसंगी कर्ज काढून हुंड्याची रक्कम जमा करतात. हुंड्यासाठी रक्कम कमी पडलीच तर लग्नानंतर रक्कम देण्याची ग्वाहीही देतात. मात्र यातूनच पुढे संसार बिनसल्याचे प्रकार घडत आहेत. येथील भरोसा सेलकडे दीड वर्षाच्या काळात १०४ विवाहितांनी सासरी छळ होत असल्याच्या तक्रारी नोंदविल्या आहेत. तसेच मागील अडीच वर्षाच्या काळात १२ विवाहितांचा हुंड्यासाठी छळ झाल्याची नोंद आहे.
अशिक्षितांपासून उच्चशिक्षितांपर्यंत...
- हुंडा मागणाऱ्यांमध्ये अशिक्षितांपासून ते उच्चशिक्षितांपर्यंत सर्वांचाच समावेश आहे. आपल्या ऐपतीप्रमाणे वस्तू, दागिन्याच्या स्वरूपात हुंडा मागितला जात आहे.
-मुलाच्या नोकरीसाठी, व्यवसायासाठी लागणारा पैसा मुलीच्या वडिलांकडूनच वसूल करण्याचा प्रयत्न मुलांकडील करतात.
- लग्नात होणारा खर्च, डीजेचा खर्च, वरातीच्या वाहनांचा खर्च, मंगल कार्यालयाचा खर्चही मुलीच्याच वडिलांनी करावा, असा आग्रह मुलांच्याकडून धरला जातो.
२५४ प्रकरणे तडजोडीने मिटविली
पती-पत्नीचे पटत नसल्याने आपल्याला विभक्त व्हायचे, यासाठी २०२० मध्ये ५१० तर २०२१ मध्ये २६३ जणांनी भरोसा सेलकडे तक्रारी केल्या होत्या. यापैकी भरोसा सेलने २५४ प्रकरणे समुपदेशनाने मिटविली आहेत. यात २०२० मध्ये १६१ तर २०२१ मध्ये ९३ प्रकरणे तडजोडीने मिटविली आहेत.
हुंडा म्हणायचा की पोराचा लिलाव?
- हुंडा म्हणून सरळ पैसे न घेता गाडी, बंगला, फ्लॅट, प्लाॅट, मौल्यवान दागिने मागितले जातात.
- लग्नात कन्यादानात झालेल्या मुलीच्या पैशांवरही सासरच्या मंडळींची नजर असते.
- लग्नानंतरही मुलांकडील लोकांच्या मागण्या कमी होत नाहीत.
नवी पिढी बदलतेय....
मुळात हुंडा घेणे हा गुन्हा आहे. तरीही अनेक जण मुलाकडची बाजू म्हणून पैसे मागतात. विवाह ठरविल्यानंतरही विविध कारणांच्या नावाखाली वाढवून पैसे मागण्याची पद्धत वाढली आहे.
- सचिन मोरे
मुलीच्या आई-वडिलांनीही मुलगा शोधताना नोकरीवालाच पाहिजे, श्रीमंतच पाहिजे असे न पाहता त्याचे कर्तृत्व आणि योग्यता तपासावी. हुंडा न घेता लग्न करणारेही समाजात बरेच जण आहेत.
-अजय चव्हाण
हुंड्यासाठी छळाचे गुन्हे
२०१९ -४
२०२० -५
२०२१ -३