हिंगोली : मागच्या ७० वर्षांपासून आमची लेकरं गुणवान असूनही आरक्षण नसल्यामुळे मागे राहत आहेत. आत्तापर्यंत अनेक आंदोलने करण्यात आली. परंतु, आश्वासनाशिवाय काहीही पदरात पडले नाही. त्यामुळे तर आता आम्हाला दंडूक घेऊन बाहेर यायची वेळ आल्याची संतप्त प्रतिक्रिया हिंगोली- नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील माळधामणी फाटा येथे ३१ ऑक्टोबर रोजी रास्तारोकोदरम्यान रणरागिणींनी व्यक्त केल्या.
मराठा आरक्षण आंदोलनाचा वणवा सर्वत्र पेटला असून, यासाठी समाजबांधवांच्या वतीने सर्वत्र आमरण, साखळी उपोषणासह रस्तारोको आंदोलन करण्यात येत आहे. जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून आरक्षण आंदोलनाची तीव्रता वाढली असून, ३० ऑक्टोबर रोजी जिल्हाभरात ठिकठिकाणी आंदोलने झाली. आरक्षणाबाबत सरकारी उदासिनता दिसून येत असल्याने मराठा समाजबांधवात संताप व्यक्त होत असून, काही ठिकाणी आंदोलन चिघळल्याचे पहायला मिळाले.
३१ ऑक्टोबर रोजी वसमत येथे माजीमंत्री जयप्रकाश मुंदडा यांच्या घरावर दगडफेक झाली. तसेच कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा फाटा, औंढा तालुक्यातील शिरडशहापूर येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तसेच हिंगोली- नांदेड महामार्गावरील माळधामणी फाटा येथे महिलांनी हातात दंडूका घेत रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनादरम्यात महिलांनी ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणाही दिल्या. रास्तारोकोमुळे महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.