हिंगोली : धुळे जिल्ह्यातील राईनपाडा गावात पाच जणांच्या हत्येच्या निषेधार्थ आज सकाळी १०.३० वाजता नाथजोगी समाजाचा मोर्चा हिंगोली जिल्हाकचेरीवर धडकला. भटक्या जमातीतील व्यक्तीवर दिवसेंदिवस अत्याचार वाढत आहेत, त्यामुळे समाजाच्या सुरक्षा द्यावी,तसेच राईनपाडा घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
जिल्ह्यातील भटक्या जमातीतील नाथजोगी, डवरी, नाथपंथी, गोसावी समाजबांधवांनी सकाळी १0.३0 च्या सुमारास गांधी चौक येथून हा मोर्चा काढला. इंदिरा गांधी चौक, अग्रसेन चौक मार्गे तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात महिला, पुरूष व तरूणांची मोठी गर्दी होती. शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आलेल्या मोर्चामुळे मुख्य मार्गावरील वाहतूक काहीवेळ ठप्प होती.
मुले पळवून नेणाऱ्या टोळीतील समजून भटक्या जमातीतील पाच जणांची हत्या केल्याची घटना धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे घडली होती. राज्यात अशा घटना वाढतच चालल्या आहेत. त्यामुळे या समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भटकंती करत भिक्षा मागून पोट भरणे हे एकमेव उपजीविकेचे साधन असल्याने शासनाने भटक्या समाजबांधवांना न्याय द्यावा. भिक्षा मागण्यासाठी गावो-गाव फिरणाऱ्यांना पोलीस प्रशासनाने ओळखपत्र द्यावीत. धुळे जिल्ह्यातील हत्येच्या घटनेतील मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, तसेच मृत्यू झालेल्या कुटुंबियांना शासनाने तत्काळ मदत द्यावी यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. मोर्चात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर, युवासेनेचे दिलीप घुगे, राम कदम यांच्यासह भटक्या विमुक्त विकास परिषद संचलित नाथजोगी विकास सेवा संस्था अध्यक्ष नारायण बाबर, सिद्धूनाथ शिंदे, आप्पा काशीराम शिंदे आदींचा सहभाग होता.