आखाडा बाळापूर : बऊर शिवारात बिबट्याने आपले हिंस्ररूप दाखविले असून, एका शेळीवर हल्ला केला आहे. शेतात पाणी देतानाच गायब शेळीच्या शोधात गेलेल्या शेतकऱ्यांची चाहूल लागताच अर्धवट तोडलेल्या शेळीला सोडून जंगली श्वापद पसार झाले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याची खबर दिली; परंतु वनविभागाचे अधिकारी नॉटरिचेबलच होते. तरीही तीन वनरक्षक घटनास्थळी पोहोचले. अर्धवट सोडलेल्या शेळीच्या शिकारीच्या ठिकाणी कॅमेरे बसविले असून, बिबट्या कॅमेराबंद होतो का, याची वाट पाहिली जात आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
कळमनुरी तालुक्यातील कांडली, भोसी शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्या वावरत असल्याचा घटना शेतकऱ्यांकडून ऐकायला मिळत होत्या. वनविभाग त्याची तपासणी करत होते; परंतु शेतकऱ्यांना घाबरविणारा प्राणी बिबट्याच आहे की नाही हे वन विभागाच्या वतीने खात्रीशीर सांगण्यात आले नव्हते. परंतु २३ जानेवारी रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या दरम्यान बिबट्याने शिवारात आपले हिंस्र रूप दाखविले आहे. येथील पोलीस पाटील रमेश महाजन हे आपल्या दोन शेळ्या व त्यांची दोन करडू घेऊन शेतात गेले होते. एक वाजण्याच्या सुमारास शेळ्या बांधून शेतात पाणी देत होते. अचानक एक शेळी आणि करडू गळ्याची दोरी तोडून ओरडत शेतकऱ्याकडे धावत आले. एक शेळी दिसत नसल्याने तिचा शोध घेण्यासाठी शेताशेजारच्या जंगलात तो शेतकरी गेला असता त्याची चाहूल लागताच त्या जंगली जनावराने आपली शिकार अर्धवट सोडून पळ काढला. शेतकऱ्याला अर्धवट खाल्लेल्या अवस्थेतील शेळी सापडली. त्याने ही माहिती वनरक्षकांना कळवली. त्यावेळी वनरक्षक एस. डी. फड, शिखरे, कचरे घटनास्थळी हजर झाले.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यास बोलवून पंचनामा केला. घटनास्थळी कॅमेरे बसविले असून, संबंधित जंगली श्वापद कोणते आहे, याचा तपास वनविभागाच्या वतीने लावण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कांडली, भोसी शिवारात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा शेतकऱ्यांनी केली होती; परंतु वनविभागाने मात्र तो बिबट्याच आहे की नाही हे निश्चितपणे सांगितले नाही. आजच्या घटनेनंतरही वनविभागाने तेथे उमटलेले पायाचे ठसे व जनावराच्या शिकारीची पद्धत पाहून ते जंगली श्वापद हे बिबट्या किंवा तडस असावे असा अंदाज बांधला आहे. अर्धवट सोडलेली शिकार खाण्यासाठी तो प्राणी परत आल्यास कॅमेऱ्यात कैद होईल, असाही विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या विभागाच्या परिक्षेत्र वन अधिकारी प्रिया साळवे मात्र फोन बंद करून सुट्टीचा आनंद घेत होत्या. इतरही वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी उपलब्ध झाले नाहीत. शेतकऱ्यांना भयमुक्त करण्यासाठी वनविभागाच्या वतीने प्रयत्न होत नसल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. फाेटाे नं. ४९