हिंगोली: सालगड्याचा भाव लाखाच्या घरात गेला असून, जनावरांचा चाराही महाग झाला आहे. अशा स्थितीत जनावरांचा सांभाळ करणे मुश्कील झाले आहे. असे असले, तरी बैलजोडीला मात्र सोन्याचा भाव आला आहे. येथील मंगळवारा येथील बैल बाजारात एक ते दीड लाख रुपयांपर्यत बैलजोडीला भाव असल्याचे पाहायला मिळाले.
कोरोना महमारीमुळे मार्च ते ऑक्टोबर असे आठ महिने बैल बाजार बंदच होता. ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून मंगळवारा येथील बैल बाजार सुरू झाला आहे. परभणी येथील खंडोबाजारानंतर दुसऱ्या क्रमांकाचा बाजार म्हणून मंगळवारा येथील बाजाराची ओळख आहे. बैल बाजारात यवतमाळ, पुसद, अकोला, लातूर, वाशीम, बीड, जालना, बदनापूर, नांदेड, अहमदपूर, गंगाखेड, परभणी, जवळाबाजार, कन्हेरगाव, आ. बाळापूर, सेनगाव, रिसोड आदी ठिकाणचे व्यापारी बैल, शेळी, म्हैस, बोकड खरेदी-विक्रीसाठी येतात. कोरोनाच्या काळात बैलबाजार बंदच होता. दोन महिन्यांपासून बाजार सुरू झाला असून, ७० ते १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत बैलजोडी विक्री झाल्याचे पाहायला मिळाले. दर आठवड्याला बैल बाजारात ५० लाखांची उलाढाल होत असते, अशी माहिती गुत्तेदार सुधीर घुगे यांनी दिली. मंगळवारा बैल बाजारात बैलांसोबत शेळी, म्हैस, बोकड आदींचीही खरेदी-विक्री होते. मंगळवारी शेळीची किंमत १५ हजार, म्हैशीची किंमत ८० हजार, बोकड १ हजार ते १५ हजार असल्याचे सांगण्यात आले. सद्य:स्थितीत कडबा २०० हजार रुपये शेकडा असल्याने जनावरांचा सांभाळ करणे कठीण झाले शेतकऱ्यांनी सांगितले.
प्रतिक्रिया
पन्नास लाखांची उलाढाल
मंगळवारा येथील बैल बाजारात दर आठवड्याला जवळपास पन्नास लाखांची उलाढाल होते. कोरोनामुळे थोडा परिणाम झाला असल्याने, उलाढालीवरही परिणाम झाला आहे. मंगळवारा येथील बैल बाजारात शेळी, म्हैस, बकरे आदी जनावरे खरेदी-विक्रीसाठी शेतकरी आणतात. कडब्याचे भाव गगनाला भिडल्याने अनेक शेतकऱ्यांनी जनावरे विक्रीला आणल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
दुधाळ जनावरांची मागणी वाढली
मंगळवारा येथील बैल बाजारात दुधाळ जनावरांना मागणी असल्याचे पाहायला मिळाले. गरिबी परस्थिती व जनावरे सांभाळणे कठीण झाल्याने अनेकांनी दुधाळ जनावरे विक्रीला आणले होते. दुसरीकडे काही जण शेतीला जोडधंदा म्हणून दुधाळ जनावरे खरेदी करताना पाहायला मिळाले. यात म्हैस, शेळी, गाय या जनावरांना चांगली मागणी असल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले.
बैलजोडीचा खर्च दिवसाकाठी ४०० रुपये
बैलजोडीला दिवसाकाठी तीनशे ते चारशे रुपये खर्च येतो. महागाईच्या काळात बैल सांभाळणे अवघड होऊन बसले आहे. सुका व ओला चारा महाग झाला आहे. जनावरांचा सांभाळ करणेही अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपली जनावरे विक्रीसाठी आणल्याचे सांगितले.
प्रतिक्रिया
जनावरे सांभाळणे झाले कठीण
महागाईने कळस गाठला आहे. कोणत्याही जनावरांचा सांभाळ करणे आजमितीस कठीणच झाले आहे. नाईलाजास्तव जनावरे विक्रीस काढत आहोत.
-कांता गाडगीळ, शेतकरी, घोटा
कडब्याचे भाव गगनाला भिडले आहेत. दोन हजार रुपये शेकडा कडबा झाला आहे. अशा परिस्थितीत जनावरांना कोणता चारा द्यावा, असा प्रश्न पडला आहे.
-संदीप बांगर, शेतकरी, हिंगोली
महागाईमुळे जनावरे सांभाळणे सद्य:स्थितीत कठीण झाले आहे. हिरवा चारा व सुका चाराही महागला आहे. सध्या कठीण परिस्थितीतून जावे लागत आहे. हे सर्व पाहता, बैलांची विक्री करावी लागत आहे.
फोटो कॅप्शन
हिंगोली येथील शेतकरी नारायण बांगर यांनी चारदाती बैलजोडी मंगळवारा येथील बाजारात विक्रीसाठी आणली होती. या बैलजोडीची किंमत १ लाख ३० हजार होती.