लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ‘आम्ही सीआयडी आॅफीसर आहोत, तुमची चौकशी करायची आहे’ असे सांगत हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथील सेवानिवृत्त शिक्षक व माजी सरपंच कान्हुजी अर्जुनराव काळदाते यांची अडीच तोळ्याची सोन्याची अंगठी पळविल्याची घटना ६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी १२ फेबु्रवारी रोजी गोरेगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सविस्तर माहिती अशी की, कनेरगाव नाका येथील एका पानटपरीच्या पाठीमागे माजी सरपंच कान्हुजी काळदाते यांना दोन अज्ञातांनी ‘आम्ही सीआयडी अधिकारी असून तुमची चौकशी करायची आहे’ असे सांगत त्यांच्या बोटातील मोठ्या शिताफीने ४६ हजार ४५० रुपये किंमतीची अंगठी काढून घेतली. त्यानंतर अंगठी कागदात गुंडाळून काळदाते यांच्या हातात दिली, व घरी गेल्यानंतरच कागदाची पुडी उघडा असे त्या दोघा इसमांनी सांगितले. त्यानंतर काहीवेळाने काळदाते हे घरी पोहचले. आणि कागदाची पुडी उघडून पाहताच त्यात एक खडा निघाला. दोघा इमसांनी फसवणूक केल्याचे काळदाते यांच्या लक्षात येताच त्यांनी चोरट्यांचा शोध घेतला. परंतु तोतया सीआयडी आॅफिसर बनून आलेले दोघेही घटनास्थळावरून फरार झाले. घटनेच्या दिवशीच ६ फेबु्रवारी रोजी काळदाते यांनी कनेरगाव नाका येथील चौकीत फसवणूक झाल्याप्रकरणी तक्रार अर्ज दिला. पोलिसांनी त्या चोरट्यांचा शोध सुरू केला. परंतु याप्रकरणी उशिराने १२ फेबु्रवारी रोजी गोरेगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे मात्र परिसरात खळबळ उडाली आहे.
तोतया सीआयडी आॅफिसरने पळविली सोन्याची अंगठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 12:42 AM