कचऱ्याच्या ढिगाऱ्याखालील विदेशी मद्यसाठा जप्तकळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाच दिवशी चार ठिकाणी छापे मारुन कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली विदेशी मद्यसाठा जप्त केला.यावेळी ६८ हजार २४० रुपयांचा माल जप्त केला.
२ जानेवारी
‘वजन’ दार दबाव अन् जुगारावर कारवाई
२०२० या वर्षाच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी विविध अवैध व्यवसायावर कारवाईचे कौतुकस्पद काम केले. एका ठिकाणी छापा मारला असताना ‘वजन’ दार दबावानंतर नांगी टाकून दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्वानाच कारवाई करत परतावे लागल्याचा प्रकार समोर आला होता.
३ जानेवारी
जि. प. अध्यक्षपदी बेले, उपाध्यक्ष आखरे
जिल्हा परिषदेत ठरल्याप्रमाणे महाविकास आघाडीची सत्ता आली आणि अध्यक्षपदी अध्यक्षपदी शिवसेनेचे गणाजी बेेले व उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे मनीष आखरे यांची बिनविरोध निवड झाली.उपाध्यक्षपदासाठी मनीष आखरे व यशोदा दराडे यांच्या शेवटपर्यत चुरस होती.
४ जानेवारी
अन् हळदीचा काटा बंद पाडला
हिंगोली बाजार समितीचे प्रशासन, संचालक मंडळ व्यापाऱ्यांकडून मलिदा खावून त्यांच्या दावणीला बांधले गेल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी हळदीचा काटा बंद पाडटल्याचा प्रकार दुपारी साडेतीनच्या वाजेच्या सुमारास घडला होता.
५ जानेवारी
८७ हजार खातेदारांच्या नावात आढळल्या चुका
जिल्ह्यात पीएम किसान योजनेत ज्या खातेदारांची प्रशासनामार्फत नोंदणी झाली अशा अनेकांच्या बँक खाते, महसूल रेकॉर्डमधील नावाशी कार्डवरील नावासोबत तफावत आढळून आली.१.९० लाख खात्यापैकी ८७ हजार खातेदारांच्या नावांमध्ये चुका आढळून आल्या.
६ जानेवारी
बांधकामासाठी ९.२१ कोटी प्राप्त
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात जिल्ह्यात १० कामांसाठी ९.२१ कोटीचा निधी प्राप्त झाला आहे.कामासाठी टप्प्याटप्प्याने निधी येत असून काही कामे जागीअभावी रखडली होती.
७ जानेवारी
४१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले
तीन वर्षापासून कोरड्या दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाने घेरले होते. २०१९ मध्ये तब्बल ४१ शेतकऱ्यांनी मृ्त्यूला कवटाळले.३७ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत देण्यात आली.
८ जानेवारी
दोन कुटुंबाचे आधारस्तंभच गेले
जिल्ह्यातील वसमत येथे मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या कमानीचे काम करत असताना लोखंडी शिडी ११ केव्ही तारांना लागली. यामुळे दोन जण ठार झाल्याची हृदयद्रावक घटना घडली होती.या घटनेत दोघे मृत्यूमुखी झाले. यामुळे दोन कुटुंबांना उघड्यावर आले.
९ जानेवारी
विद्यार्थ्यावर आली उपासमार
हिंगोली तालुक्यातील लोहगाव येेथील स्व. श्रीराम पवार अनुदानीत आश्रमशाळेत सहा महिन्यापासून विद्यार्थ्यांवर उपासमारीचे दिवस ओढावले. कारवाई होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या द्यावा लागला.
१० जानेवारी
हिंगोलीत दोन अपघातात एक ठार
जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील दोन वेगवेगळ्या अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाला.
संतप्त शेतकऱ्यांनी मोंढ्यात केले गेटबंद आंदोलन
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत वशीलेबाजीचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला. ९ जानेवारी राेजी हळदीचे वाहने आधीच बाजार समित्याच्या यार्डात सोडल्याने गेटबंद आंदोलनामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
११ जानेवारी
सीएए विरोधात हिंगोली धरणे
केंद्र शासनाने आणलेल्या सीएए, एनआरसी व एनपीआर हा कायदा देशाची फाळणी करणारा व दोन समाजात दरी निर्माण करणारा काळा कायदा असल्याचा आरोप करुन त्या विरोधात हिंगोली म.गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.
१२ जानेवारी
नळयोजनासाठी आता जलसंधारणाची कामे
पाणीपुरवठा योजनांचे स्त्रोत आटल्याने या योजनांना उन्हाळ्यात घरघर लागण्याचे शुक्लकाष्ठ संपविण्यासाठी या उदभवणाच्या परिसरात जलसंधारण व वृक्षारोपन करण्याची बाब विचाराधीन आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने यासाठी प्रस्ताव मागविले होते.
१३ जानेवारी
बालक मागणार न्यायालयात दाद
जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणीत शाळेच्या चुकीमुळे ५४ विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळाले नाही. यामुळे या विद्यार्थ्यांना परिक्षेपासून वंचित राहावे लागले. परिणामी पालकांनी न्यायालयात दरवाजा ठोठावला.
१४ जानेवारी
औंढा नागनाथ तालुक्यातील ४०० घरकुलधारकांना नोटिसा
पंचायत समिती अंतर्गत होत असलेल्या १०१ ग्रामपंचायतीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक विहीरीचे काम प्रगतीपथावर आहेत. तालुक्यात ४०० घरकुलधारकांना वेळेत काम पूर्ण करण्यासाठी पंचायत स्तरावरुन नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या.
१५ जानेवारी
हिंगोली जि.प. महाआघाडीत फुट
महाविकास आघाडीला हिंगोली जिल्हा परिषदेत शिवसेनेचे आमदार संतोष बांगर सुरूंग लावत अनुभवी व दिग्गज असलेल्या जयप्रकाश दांडेगावकर व राजीव सातव यांना राजकीय मात दिली. शिवसेनेने एक जास्तीचे सभापती पद बळकावत राष्ट्रवादी व काँग्रेसच्या बंडखोरांना सभापती पदी विराजमान करण्यात मोलाची भूमिका बजावली.
१६ जानेवारी
५४२ घरकुलांच्या कामांना फटका
वाळू घाटाच्या लिलावाची प्रक्रीया ठप्प आहे. शासन नव-नवीन सुचना काढत असल्याने वाळू घाट लिलाव होतील की नाही शंका आहे. याचा फटका ५४२ घरकुलांना बसला.
१७ जानेवारी
३६ गावांना कृषी संजिवनी योजनेचा लाभ
दुष्काळग्रस्त गावातील शेतकऱ्यांची जीवनमान आणि दर्जा उंचाविण्यासाठी शासनाने नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प सुरू केला. या अंतर्गत वसमत तालुक्यातील ३६ गावांना या योजनेचा लाभ मिळाला.
१८ जानेवारी
१०० क्विंटल भाजीप्रसादाचे वाटप
औंढा तालुक्यातील शिरडशहापूर येथील सारंगस्वामी महाराज यात्रा प्रसिद्ध आहे. यासाठी १०० क्विंटल भाज्यांची खरेदी करण्यात आली. भाविकांना १७ जानेवारी रोजी भाजीप्रसाद वाटप करण्यात आला.
१९ जानेवारी
२२ नळयोजनांसाठी १३.४६ कोटींची मान्यता
जिल्ह्यात राष्ट्रीय पेेयजलच्या पाणाीपुरवठा आराखड्यात तब्बल १७० पेक्षा जास्त गावे आहेत. पहिल्या टप्प्यात २२ गावांना प्रशासकीय मंजुरी मिळाली. त्यांची अंदाजपत्रकेय किंमत १३.४६ कोटी एवढी आहे.
२० जानेवारी
टीईटी परिक्षेपासून विद्यार्थी वंचित
शिक्षण विभागातर्फे १९ जानेवारी राेजी हिंगोली शहरातील १२ परिक्षा केंद्रावरील २ सत्रामध्ये परीक्षा घेतली. परंतु आदर्श महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारल्याने एकच गोंधळ उडाला होता. यामुळे विद्यार्थी वंचित राहीले.
२१ जानेवारी
हिंगोली नगर परिषदेला बांगड्याचा आहेर
विराट लोकमंचच्या वतीने हिंगोली शहरातील मुख्य मार्गावरुन शासन - नगर परिषद प्रशासनाची शव यात्रा काढुन आंदोलन केले. एवढेच नाही तर बांगड्याचा आहेर दिला.
२२ जानेवारी
न.प.कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील नगर पंचायतमधील मुख्याधिकाऱ्यांना कर्तव्यावर असताना शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेच्या निषेधार्थ न.पं. कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.
२३ जानेवारी
पोलीस धडकल्याने उडाली घाबरगुंडी
शिक्षणाधिकाऱ्यावर नांदेड येथील प्रकरणात गुन्हा दाखल असल्याने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सभागृहात स्थलांतरीत झालेल्या शिक्षण विभागात पोलीस गेल्याने घाबरगुंडी उडाली. मात्र ते तेथे पडून असलेल्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील योजनेतील मोटार सायकलींची चौकशी करुन निघून गेले.
२४ जानेवारी
गोरेगावची अतिरिक्त तहसील नावालाच
गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयाच्या शुन्य कारभारामुळे गोरेगाव तालुका निर्मीतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. याठिकाणी अद्यापही दप्तरी काम सुरू झाले नाही. यामुळे गोरेगावची अतिरिक्त तहसील नावालाच आहे की काय असा प्रश्न गोरेगावकरांनी केला आहे.
२५ जानेवारी
जि.प.समोर केले दिव्यांगांनी आंदोलन
विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील दिव्यांगांनी जि.प.समोर आंदोलन करुन परिसर दणाणून टाकला होता. यावेळी बोंबाबोंब आंदोलनही करण्यात आले.
२६ जानेवारी
शाळा बांधकामाचा ५२ कोटीचा प्रस्ताव
जिल्ह्यातील अनेक शाळेंना इमारती नाहीत. ९ शाळांच्या इमारतीच्या ५२ कोटीचा प्रस्ताव तयार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. तसेच तो प्रस्ताव ग्राम विकास विभागाकडे पाठविण्याची सुचनाही करण्यात आली. याबाबतची माहिती पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिली.
२८ जानेवारी
गोरेगाव बंदचा गावकऱ्यांचा इशारा
दोन वर्षांपासून पर्यायी रेशन वितरणाची सुरू असलेली अनागोंदी न थांबल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामविकास दक्षता समितीने बैठकीत दिला. यावेळी गोरेगाव बंदची हाकही पुकारण्यात आली.
२९ जानेवारी
निधीअभावी रस्ता रखडला
औंढा शहरातून जाणाऱ्या दोन किमी रस्त्याचे काम निधीअभावी रखडले होते. या प्रकारामुळे नागरिकांना धुळीचा त्रास होत होता.
नियोजनला बाधा होण्याची शक्यता
मागच्या वेळी दलितवस्ती सुधार योजनेच्या गाव निवडीवर आक्षेप घेत न्यायालयात धाव घेणारे फकीरा मुंढे या खात्याचे सभापती झाले. त्यामुळे काँग्रेसची बरेचशी मंडळी वेगळा सूर अवगत होती. दलितवस्ती सुधार योजनेच्या नियोजनाला राजकीय बाधा लागण्याची शक्यता वर्तवली गेली.
३० जानेवारी
जि.प.ची १९० कामे निविदेतच
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत असलेली १९० कामे निविदास्तरावर पडून आहेत. १३० कामे पूर्ण झाली.
३१ जानेवारी
पीकविमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड
शेतकऱ्यांना पिकविम्याची भरपाई मिळाली नाही. शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेण्यास कंपनीचे कार्यालय तयार नाही असा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बजाज अलायन्स कंपनीच्या एनटीसी भागातील कार्यालयात घुसून तोडफोड केली.