सेनगाव: तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या गोरेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत दोन्ही गोरेगावकर माजी आमदारांनी एकत्र येवून पहिल्यांंदाच संयुक्तिक पॅनल उभा केला आहे. त्यांच्या विरोधात कधीकाळी कार्यकर्ते म्हणून काम करणाऱ्या शिष्यांनीच दंड थोपटले असून, विरोधाकांची भूमिका निभावत असल्याने दोन्ही माजी आमदारांची गोरेगावात प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
राजकीय राजधानी म्हणून कधी काळी ओळख निर्माण केलेल्या व तालुक्यातील सर्वात मोठा असलेल्या गोरेगाव ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. ८०४० मतदान असलेल्या गोरेगावात १७ जागांसाठी ३६ उमेदवार रिंगणात आहेत. पहिल्यांंदाच गोरेगावात पारंपरिक विरोधक असलेले माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर व माजी आमदार साहेबराव पाटील गोरेगावकर हे मातब्बर ग्रामपंचायत निवडणुकीत एकत्र आले आहेत.
विधानसभा निवडणुकीत एकत्र आलेल्या हे दोन्ही नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत एकत्र राहणेच पसंद केले आहे. यापूर्वीच्या अनेक निवडणुकीमध्ये दोन्ही मातब्बरांचे एकमेकांचा विरोधात पॅनल राहत असायचे. परंतु दोघांनी एकत्र येवून संयुक्तिक पॅनल उभा केला आहे. पंरतु दोन्ही माजी आमदार एकत्र आल्याने विरोधकांची मोट त्यांच्या विरोधात कधीकाळी दोघांचे कार्यकर्ते म्हणून राहिलेले जि.प. सदस्य संजय कावरखे, डॉ.रवी पाटील गोरेगावकर यांनी एकत्र येवून पॅनल उभा केला आहे. ज्यांंच्या नेतृत्वाखाली राजकारणाचे धडे घेतले त्यांंच्या विरोधातच आपला पॅनल उभा करीत विरोधक म्हणून दंड थोपटले आहेत. एक प्रकारे गोरेगावातात गुरु -शिष्याच्या लढाईत कोण बाजी मारणार, यांचा अंदाज बांधला जात आहे.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न,गावाचा विकास ,या सह अन्य मुलभूत प्रश्ना बरोबर भावकी व गावकीचे राजकारण गोरेगावात तापले आहे. दोन्ही माजी आमदारांना गावात शह देण्याचा प्रयत्न कसा हाणून पाडतात. मतदार कुणाला कल देणार यांचे अंदाज गावात बांधले जात आहेत. कॉर्नर बैठका, घरपोच भेटी घेत उमेदवार मतदानाचे आवाहन करीत आहेत.