- दिलीप कावरखेगोरेगाव ((जि. हिंगोली ): येथे सकल मराठा समाजाच्या वतीने १५ फेब्रुवारी रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त फेसबुक पोस्ट प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला चपला - जोडे व दंडुक्याने चोप देत जाळून टाकीत निषेध नोंदविण्यात आला.
सगेसोयऱ्यांचा कायदा लागू करून मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण आंदोलन सुरू आहे. दरम्यान जरांगे यांची प्रकृती खालावत असताना मराठा समाजामध्ये सरकारच्या दुर्लक्षित धोरणाबाबत असंतोष व्यक्त केला जात असून सर्वत्र आंदोलनाचे पडसाद उमटत आहेत. सदर आंदोलनाच्या समर्थनार्थ गोरेगाव येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देत १५ फेब्रुवारी रोजी बंद पुकारण्यात आला.या प्रसंगी दिवसभर बाजारपेठेत स्वयंस्फूर्तपणे कडकडीत बंद पाळण्यात आला.
दरम्यान, जरांगे पाटील यांच्या विषयी करण्यात आलेल्या वादग्रस्त फेसबुक पोस्ट प्रकरणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मराठा समाज बांधवांकडून केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला चपला जोडे व दंडुक्यांनी चोप देत, प्रतिमा दहन करून घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला. यावेळी प्रदीप पाटील, बाबुराव कावरखे, सतीश कावरखे, गजानन कावरखे, पंजाब कावरखे, सुभाष अवचार, जी. एम. खिल्लारी, शिवाजी कावरखे, जगन कावरखे , माधव कावरखे, भगवान देशमुख आदी सह शेकडो मराठा समाज बांधवांची उपस्थिती होती.
ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ... गोरेगाव बंदच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर यांच्याकडून सकाळपासून गावामध्ये पेट्रोलिंग सुरू करण्यात आली असताना छत्रपती शिवाजी महाराज चौक मा जिजाऊ चौक येथे चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.