लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात २७ नोव्हेंबर पासून गोवर- रूबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. ९ ते १५ वयोगटातील बालकांना ही लस देण्यात येणार असून यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. जवळपास दीड महिना ही मोहीम सुरू राहणार आहे. ३ लाख १८ हजार २३० बालकांना लस देण्याचे उदिष्ट आहे.गोवर हा अत्यंत संक्रामक आणि घातक आजार आहे. जो मुख्यत: मुलांना होतो. गोवर आजारामुळे भारतामध्ये दरवर्षी ५० हजार रूग्ण मृत्युमुखी पडतात. रुबेला या आजाराचा संसर्ग गरोदर मातांना झाल्यास गर्भपात किंवा जन्मजात दोष निर्माण होऊ शकतात. यात बहिरेपणा आणि हृदयविकृती होऊ शकते. त्यामुळे गोवर, रूबेला ही लस दिली जाणार आहे. आरोग्य विभागाकडे २ लाख १६ हजार डोस उपलब्ध आहेत.भारत सरकारने २०२० पर्यंत गोवर आजाराचे निर्मुलन व रुबेला या आजाराचे नियंत्रणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार २७ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. मोहीमेअंतर्गत ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील जवळपास ३ लाख १८ हजार २३० बालकांना लस देण्यात येणार आहे. जवळपास दिड महीना ही मोहीम राबविली जाणार आहे. सदर मोहिम शिक्षण विभाग, महिला व बाल कल्याणच्या संयुक्त विद्यमानाने राबविण्यात येणार आहे.जनजागृती : जागतिक आरोग्य संघटनेतर्फे पाहणीआरोग्य विभागाने जिल्हाभरात कार्यशाळा, यात्रोत्सव व मेळावे घेऊन तसेच बॅनर, पोस्टर, शाळेतील विद्यार्थ्यांची प्रभातफेरी, पथनाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम, भजन व किर्तन शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करून जनजागृती केली. विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. दिलीप देशमुख हे २९ ते ३० आॅक्टोबर दरम्यान गोवर-रुबेला लसीकरण तपासणीसाठी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी अनेक गावांना भेटी देऊन अंगणवाडी, आशा स्वयंसेविका, व मातांच्या भेटी घेत गोवर रुबेला लसीकरणा बाबत माहितीही विचारली होती. यावेळी त्यांना समाधानकार उत्तरेही मिळाली होती.गोवर आणि रूबेला नेमका कोणता आजार आहे?४गोवर हा प्राणघातक व संसर्गजन्य रोग आहे. बालकांमधील अपंगत्व तसेच मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी आहे. या रोगामाध्ये रूग्णाला ताप येणे, सर्दी, वारंवार खोकला, पुरळ येणे, डोळे लाल होणे, इत्यादी लक्षणे आढळतात. हा रोग रूग्णांच्या खोकल्याद्वारे पसरतो. रूबेला रोगाचे गर्भवती महिलेला गर्भावस्थेत सुरवातीच्या काळात संसर्ग झाला तर त्याचा परिणाम सीआरएस मध्ये होऊ शकतो. त्याचा परिणाम गर्भ आणि नवजात शिशुसाठी गंभीर आहे. रूबेला संसर्ग झालेल्या मातांनी जन्म दिलेल्या बालकांना विकृतीची संभावना असते परंतु हे दोन्ही रोग लसीकरणामुळे टाळता येतात. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी दिली.गोवर, रूबेला लस जिल्हा आरोग्य विभागाकडे उपलब्ध झाली आहे. लसीकरण मोहीम राबविण्यात येणारी यंत्रणाही सज्ज असून ९ ते १५ वयोगटातील मुला, मुलींना लस देण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. शाळा अंगणवाडी व प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालयांत प्रशिक्षित २९८ कर्मचाºयांद्वारे ही लस दिली जाणार असल्याचे जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी प्रशांत तुपकरी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
गोवर-रूबेला लसीकरण मोहिमेस उद्यापासून प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:12 AM