सेनगाव : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये आर्थिक मदत त्वरीत द्यावी तसेच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी यासह विविध मागण्यांसाठी तालुका काँग्रसने बुधवारी (दि. ६) हिगोली -जिंतूर रस्त्यावर रस्तारोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी सरकार शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणत आहे असा आरोप केला.
तालुक्यात परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. परंतु अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत करण्यात आली नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने रास्तारोको करण्यात आला. राज्यात ओला दुष्काळ जाहिर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये आर्थिक मदत त्वरीत द्यावी यासह विविध मागण्यांसाठी रस्तारोको करण्यात आला. हिगोली -जिंतूर या मुख्य मार्गावरील टि पाँईडवर रस्तारोकोमुळे जवळपास तासभर वाहतुक ठप्प झाली होती. वाहनांच्या रस्त्यावर लांबलचक रांगा लागल्या होत्या.
शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे...अतिवृष्टीमुळे तालुक्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन,कापूस,झेंडू या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांने जगावे कसे असा सवाल काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनायकराव देशमुख यांनी या वेळी बोलताना केला. हे सरकार शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणत आहे असा गंभीर आरोप ही त्यांनी यावेळी केला.
आंदोलनात काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनायकराव देशमुख,जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय देशमुख, माजी जि.प.सदस्य द्वारकदास सारडा, युवक लोकसभा उपाध्यक्ष जितु देशमुख, पंचायत समिती सभापती स्वाती देशमुख, रणजित पाटील गोरेगावकर, वामन राठोड, नारायण डुबे,गजानन क्षीरसागर,अनिल पाटील,शालीक देशमुख,भगवान काळबांडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता.