हिंगोली : कोरोना महामारीच्या काळातही शेतकऱ्यांनी स्वत:चे दु:ख बाजूला सारुन राज्यातील सर्व जनतेस कोणत्याही प्रकारचे अन्नधान्य आणि दूधाची कमी पडू दिली नाही. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून समाजानेही शेतकरी बांधवांना मानसिक आधार देवून साथी द्यावी, असे आवाहन कृषी मंत्री दादा भूसे यांनी हिंगोली येथे केले.
कृषी मंत्री दादाजी भुसे हे दि. २७ रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी पुरामुळे झालेल्या नुकसानीचा व कृषी विषयक योजनांचा आढावा घेतला. यावेळी हिंगोली व परभणी येथील प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर भुसे यांनी हिंगोली जिल्ह्यात पाऊस आणि पुरामूळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, खा. हेमंत पाटील, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. संतोष बांगर, आ. राजू नवघरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, कृषी सहससंचालक तुकाराम जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी अरुण संगेवार, हिंगोलीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे, परभणीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे आदी उपस्थित होते.
सध्या हिंगोली व परभणी जिल्ह्यात दररोजच कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत असुन ढगाळ वातावरणामुळे पिके पिवळी पडत आहे. अतिवृष्टीमुळे ज्या ठिकाणी पिकांचे नुकसान झाले तेथील पिकांचे जलदगतीने पंचनामे करावेत. यासाठी आवश्यकता भासल्यास ग्रामविकास व महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी नियुक्त करुन या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने हे पंचनामे तात्काळ पूर्ण करावेत अशा सूचनाही कृषी मंत्र्यांनी दिल्या. तसेच भूसे यांनी पिक विमा कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधींशी भ्रमणध्वणीवर संपर्कही साधला.