लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सोळाव्या शतकात छत्रपती शिवरायांनी सर्वसामान्यांसाठी उभे केलेले स्वराज्य जगाच्या पाठीवर आजही आदर्श आहे. परंतु, दुर्दैव म्हणजे सरकारलाच या शिवशाहीचा विसर पडला आहे. छत्रपती शिवरायांचे धार्मिक, स्त्री विषयक, शेतकरीविषयी धोरण आणि आजची अनागोंदी पाहता लोकशाही देशात शिवशाहीचे आदर्श मूल्य पायदळी तुडविले जात असल्याचे परखड मत जिजाऊ व्याख्यानमालेत ४ जानेवारी रोजी बोलताना डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रवक्ते प्रवीण देशमुख (यवतमाळ) यांनी व्यक्त केले.अॅड.ग्यानबाराव सिरसाट विचारमंच महावीर भवन येथे जिजाऊ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव ढोकर पाटील, उद्घाटक उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, प्रमुख उपस्थिती सा.बां.चे कार्यकारी अभियंता सुधाकर घुबडे, परभणीचे तालुका कृषी अधिकारी रामचंद्र तांबिले, बाबाराव श्रृंगारे आदींची उपस्थिती होती. 'छत्रपती शिवारायांच्या शिवशाहीचा आदर्श व वर्तमान लोकशाहीचा परामर्श' या विषयावर पुढे बोलताना प्रवीण देशमुख म्हणाले की, स्वराज्यात महिला सुरक्षित होती. पण, आज चार मिनिटाला महिलांवर बलात्कार होतो. स्त्री विषयक दृष्टीकोण बदलला आहे. लोकशाहीची व्याख्याही राजकारण्यांनी बदलली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात रक्तपाताशिवाय लोकांच्या जीवनात परिवर्तन करणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही होय. पण, बाबासाहेबांच्या या विचाराला आज राज्यकर्त्यांकडून छेद दिला जातो.हिंदू, मुस्लिम यांच्यात वाद घडवून दंगली घडविल्या जातात. छत्रपतींच्या धर्मनिरपेक्ष कारभाराचा विसर पडला आहे. कुरणाचे पान जमिनीवर पडले असले तरी छत्रपती शिवराय ते पान मस्तकी लावून मुस्लिम मावळ्याच्या हवाली करायचे, हा इतिहास आहे.कर्जमाफीविषयी बोलताना ते म्हणाले जगद्गुरू तुकाराम महाराजांनी सर्वप्रथम कर्जमाफी केली. त्यानंतर छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी राजेंनी कर्जमाफी केली. आताच्या सरकारकडे उद्योगपतींचे कर्ज माफ करायला पैसे आहेत; मग शेतकऱ्यांसाठी का नाही? असा प्रश्न त्यांनी केला. तसेच स्वयंघोषित संत हे समाजासाठी दिशादर्शक नसून धार्मिक दलाल झाले असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला. देशात अनागोंदी कारभार सुरू असून, सरकारविरूद्ध बोलणाºया दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांची हत्या केली जाते. भीमा- कोरेगावसारख्या दंगली घडविल्या जातात. हे सर्व थांबवायचे असेल तर आम्हाला शिवशाहीतील धार्मिक धोरण, संहिष्णुता, स्त्री स्वातंत्र्य, शेतकरी धोरण, समता अंगिकारणे गरजेचे आहे. तेव्हाच लोकशाहीत शिवशाही अवतरेल, असा आशावाद प्रवीण देशमुख यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन राधाकिशन कºहाळे, प्रास्ताविक शिवाजीराव ढोकर पाटील यांनी केले. परिचय ज्ञानेश्वर लोंढे यांनी करून दिला. तर आभार प्रा.माणिक डोखळे यांनी मानले.
सरकारला शिवशाहीचा विसर पडलाय-देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2019 12:13 AM