लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : येथील शासकीय योजनेचे धान्य साठवण्याच्या मुख्य गोदामास शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास आग लागली. गोदामातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच वेगाने हालचाली करून अग्निशामक दलाच्या सहाय्याने नुकसान झाले नाही. मात्र तत्परतेने मोठी हानी टळली आहे. सीसीटीव्ही बंद असल्याने आग कशी लागली हे समजणे कठीण आहे.वसमत येथे पुरवठा विभागाचे नवीन गोदाम बांधण्यात आलेले आहे. या गोदामात तालुक्यातील धान्य साठवले जाते. या गोदामाच्या खिडकीतून शनिवारी दुपारनंतर अचानक धूर निघणे सुरू झाले. गोदामावर आलेल्या गाडीचा चालक जीवन साठे याच्या हे निदर्शनास आले. चालकाने गोदाम किपर शेख एजाज यांना मोबाईलवर ही माहिती दिली. त्यांनी तातडीने अग्निशमक दलाला पाचारण केले. तातडीने अग्निशामक दल व पोलीस दाखल झाली. अग्निशामक दलाच्या मदतीने आग नियंत्रणात आली. गोदामास असलेल्या खिडकीतून कोणी तरी गोदामात आग लावण्याचा प्रयत्न केला असल्याचा संशय व्यक्त होत आहे. घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला आहे. गोदाम किपर शेख एजाज यांच्याशी चर्र्चा केली असता त्यांनी कोणतेही नुकसान झाले नाही, असे सांगितले. धान्याच्या पोत्यांच्या थप्पीच्या आतून धूर निघत असल्याने थप्पी हलवण्याचे काम करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकंदरीत चालकाची समयसुचकता व गोदाम किपरची तत्परता यामुळे मोठी हानी टळली आहे एवढे मात्र निश्चित. शासकीय गोदामांवर सिसीटीव्ही आहेत. मात्र गोदामात आग लावण्याचा प्रयत्न कोणाचा हात आहे, हे समजण्यास मार्गच नाही. वीज नसल्याने शार्ट सर्कीट होण्याचा प्रश्नच नाही.
शासकीय धान्य गोदामाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:04 AM