सेनगाव (जि. हिंगोली) : विकायला काढलेल्या गावाची प्रत्यक्ष जाऊन माहिती घेऊन दोन दिवसांत सविस्तर अहवाल द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तहसीलदारांना दिल्या आहेत. ताकतोडा ग्रामस्थांनी गावच विकायला काढले. शेतकऱ्यांची ही उद्विग्नता ‘लोकमत’ने मांडल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने याची दखल घेतली. तसेच हिंगोलीचे पालकमंत्री अतुल सावे यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देत ग्रामस्थांचे प्रश्न समजून घेण्यास सांगितले आहे.सेनगाव तालुक्यातील ताकतोडा गुरुवारी अचानक प्रसिद्धीच्या झोतात आले. आर्थिक कोंडमारा झाल्याने ग्रामस्थांनी गावच विकायला काढले. गाव विकूनही प्रश्न सुटणार नसेल तर, मग इच्छा मरणाची परवानगी द्या, अशी मागणी करुन गावकºयांनी खळबळ उडवून दिली.जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले, सेनगावच्या तहसीलदारांना सूचना दिल्या आहेत. प्रत्यक्ष गावात जाऊन त्याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल दोन दिवसांत देण्यास सांगितले आहे.>ताकतोडा गावात जावून प्रत्यक्ष ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी पीकविमा, कर्जमाफी या प्रमुख मुद्यांसह पीककर्ज देण्याची मागणी केली. पीक कर्जासंदर्भात बँकांना सूचना देण्यात येतील. मात्र पीकविमा व कर्जमाफी हे शासन स्तरावरील मुद्दे असल्याने शासनाकडे पाठवू. - जीवककुमार कांबळे, तहसीलदार, सेनगाव
विकायला काढलेल्या गावाची सरकारने घेतली तातडीने दखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 5:08 AM