महाराष्ट्रातील हजारो ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी राज्यातील हजारो कर्मचारी, अधिकारी नेमलेले आहेत. त्यांना मतदान अधिकारी म्हणून निवडणूक प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणावेळी व निवडणुकीच्या दिवशी कोणत्याही प्रकारची हलगर्जी होऊ नये यासाठी मतदान अधिकारी स्वखर्चाने वेगवेगळी वाहने करून दिलेल्या दिवशी नियोजित ठिकाणी वेळेवर हजर राहतात. तसेच मतदानाच्या दिवशी सलग बारा ते पंधरा तास काम करावे लागते. आजपर्यंतचा ग्रामपंचायत निवडणुकींना मतदान अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा भत्ता, मानधन दिले जात नाही. त्यामुळे नियुक्त मतदान अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक झळ बसू नये. त्यांना इतर निवडणुकीप्रमाणे मानधन देण्यात यावे, अशा प्रकारची मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्याम माने, औंढा तालुका अध्यक्ष मनोहर पोले, तालुका कार्याध्यक्ष पृथ्वीराज कदम, सचिव मुंजाजी नवले, कोषाध्यक्ष ज्ञानोबा वाले आदी शिक्षकांनी केली आहे.
ग्रा. पं. निवडणुकीत मतदान अधिकाऱ्यांना मानधन देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 5:17 AM