हिंगोली: जिल्ह्यात ४९५ ग्रामपंचायती असून, या ग्रामपंचायतींसाठी २३ डिसेंबर ते ३० डिसेंबरदरम्यान अर्ज मागविण्यात आले होते. ३१ डिसेंबर रोजी या अर्जाची छाननी करण्यात आली. चार जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेणे व चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पसंतीक्रम ठेवण्यात आलेला आहे. ज्यांनी उमेदवारी अर्ज भरतेवेळेस पसंतीक्रम दिला आहे, अशांनाच त्यांच्या पसंतीक्रमानेच अनुक्रमाप्रमाणे चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहेत. यासाठी १९० मुक्त चिन्हांची यादी कल्याण मंडप येथे पाहण्यासाठी डकविण्यात आली आहे.
२३ डिसेंबरपासून निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. ग्रामीण भागात सरपंचांना मान असल्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरू पाहत आहे. गावोगावी पॅनलप्रमुख बैठकांवर भर देऊ लागले आहेत. काही जणांनी तर बिनविरोध ग्रामपंचायतकडे लक्ष केंद्रित केले आहे. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी ४ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ४९५ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० पासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत राहील. मतमोजणी १८ जानेवारी रोजी होणार असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले.
अशी आहेत चिन्हे
n कपाट, पट्टा, विटा, सफरचंद, बाकडे, ब्रीफकेस, ऑटोरिक्षा, सायकलपंप, पांगुळ गाडा, दुर्बीण, फुगा, बिस्कीट, ब्रश, टोपली, फळा, बादली, बॅट, चमचा, होडी, बस, फलंदाज, पुस्तक, मण्यांचा हार, टायर्स, सेफ्टी पीन, पचिंग मशीन, रोडरोलर, जेवणाची थाळी, उशी, टेबल लॅम्प, स्टूल, कढई, सीतार, चालण्याची काठी, कलिंगड, नारळाची बाग, पोळपाट, लाटणे, विजेचा खांब, फुगा, अंगठी, खलबता, पेनची नीव, कंपासपेटी, रूम कुलर, ब्रश, कात्री, प्लास्टिक थाळी, टोपी, ब्रीफकेस, ब्रश, बादली, पुस्तक, ब्रेड टोस्टर, पाव, बस, गणकयंत्र, कॅमेरा, कानातले दागिने, ड्रील मशीन, डंबेल्स आदी.
कोणते चिन्ह मिळते याकडे लक्ष
‘मिनी संसद’ म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. यासाठी २३ डिसेंबर २०१९ पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. आता निवडणुकीत कोणते चिन्ह मिळते याकडे भावी ग्रामपंचायत उमेदवारांचे लक्ष लागल्याचे सध्यातरी पाहायला मिळत आहे.
निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा व तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी ४ जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. सध्या १९० चिन्हांची यादी कल्याण मंडपम येथे डकविण्यात आली आहे. पसंतीक्रमाप्रमाणेच चिन्हांचे वाटप केले जाईल. यासाठी पाच पसंतीक्रमही घेतले आहेत.
- पांडुरंग माचेवाड, तहसीलदार, हिंगोली
चिन्हे मिळाल्यावरच सर्व खटाटोप केला जाणार
‘मिनी संसद’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी पॅनल बनविले गेले आहेत. या पॅनलच्या मार्फत अनेक जण निवडणूक रिंगणात उतरले आहेत. एका गावात नाही म्हटले तरी एका-एका गावामध्ये दोन ते तीन पॅनल बनविले गेले आहेत. निवडून आलेला उमेदवार हा नंतर पॅनलप्रमुख सांगेल त्या प्रमाणे काम करणार आहे. होऊ घातलेल्या निवडणुकीत कुठल्या एका पॅनलला निवडणूक चिन्ह मिळणार नाही. निवडणुकीतील उमेदवारांना वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवावी लागणार आहे. येत्या ४ जानेवारी रोजी चिन्हाचे वाटप होणार असून कोणते चिन्ह पदरात पडते, याकडे लक्ष लागले आहे.