हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील मग्रारोहयोच्या घोटाळ्यातील चौकशी आता पूर्ण झाली असून, त्याचा अहवाल बाहेर आला नसला तरीही थेट चार कंत्राटी कर्मचारी सेवामुक्त झाले आहेत. लिपिक, लेखाधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांवरील कारवाई जि. प.कडून विभागीय आयुक्तांकडे प्रस्तावित करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सुचविले आहे.
हिंगोली जिल्ह्यात औंढा तालुक्यात मग्रारोहयो घोटाळ्याचा बीड पॅटर्न समोर आला. यात गॅबियन बंधाऱ्याची कामे न करताच पैसे हडपण्याचा डाव उघडकीस आला. या प्रकरणात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी नेमलेल्या चौकशी समितीने अहवाल सादर केला आहे. यामध्ये औंढा पंचायत समितीतील एपीओ गजानन कल्याणकर, पीटीओ राहुल सूर्यवंशी, सुयोग जावळे तर वसमत पंचायत समितीतील ऑपरेटर देवराव कंठाळे या चौघांवर सेवामुक्तीची कारवाई करण्यात आली आहे. तर उदय उपवार, श्यामसुंदर जोंधळे, विनोद गायकवाड, विनोद घोडके आदी कर्मचाऱ्यांचा या प्रकरणातील सहभाग स्पष्ट झाल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.
हा तर मोठा विनोद..!विनोद गायकवाड व विनोद घोडके हे औंढ्यातील ऑपरेटर आहेत. जॉबकार्ड तयार करण्यासह वर्क कोड जनरेट करण्यात त्यांचा वाटा असल्याचे अहवालात म्हटलेले आहे. मात्र सेवामुक्तीच्या यादीत न येता टांगती तलवार तेवढी ठेवली आहे. अहवालानुसारच कार्यवाही प्रस्तावित झाली की कसे? असा सवाल करून हा तर मोठा विनोद असल्याचे पं.स.तील कर्मचारीच सांगत आहेत.
प्रशासकीय व फौजदारीही सुचविलीपंचायत समितीतील जि.प.च्या अस्थापनेवरील कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांबाबत कार्यवाहीचा निर्णय जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घ्यावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सुचविले आहे. गटविकास अधिकारी, लेखाधिकारी, लिपिक आदींवर ही कारवाई होणार आहे. यात त्यांच्या अधिकारात ज्यांच्यावर कारवाई शक्य आहे, त्यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यवाही करतील. तर इतरांवर विभागीय आयुक्तांकडे कारवाईसाठी प्रस्तावित करण्यास सांगण्यात आले. तर निलंबन करून विभागीय चौकशी तसेच आर्थिक अनियमिततेबाबत फौजदारी दाखल करण्यासही सांगण्यात आले आहे.