- शेख इलियास (कळमनुरी, हिंगोली)
कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील कृषी पदवीधर तरुणाने कृषी सहायकाची नोकरी सोडून हायटेक फुलशेतीचा आदर्श शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. नागेश खांडरे यांनी कृषी सहायकाची सहा महिने नोकरी केली; परंतु तेथे त्यांचे मन रमले नाही. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून हायटेक शेती करण्याचा विचार त्यांनी केला. २०१५ मध्ये खांडरे यांनी १० गुंठ्यांत जरबेरा फुलाची शेती केली. एकदा लावलेले जरबेराच्या रोपांपासून चार वर्षे फुले मिळतात. १० गुंठ्यांत त्यांनी खर्च वजा जाता १६ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.
जरबेरा फूल उत्पादक शेतकरी कमी असल्याने बाजारात स्पर्धा कमी असते. त्यामुळे साधारणत: ३ ते ७ रुपये प्रतिनग दर त्यांना मिळाला. पुणे येथील कंपनीकडून ३५ रुपये प्रतिझाड जेरबेराची रोपे आणली. अडीच फूट रुंदीच्या बेडवर ही रोपे लावली. वर्षभर या रोपट्यांना फुले येतात. महिन्याकाठी १४ ते १५ हजार फुले येतात. प्रतिफुलाला ३ रुपयांप्रमाणे किंमत असते. सण, उत्सव, लग्न समारंभाच्या दिवशी ही फुले प्रतिनग १२ ते १५ रुपयांपर्यंत विकली जातात. जरबेरा या फुलांना बाराही महिने मागणी असते. उन्हापासून या फुलांचे संरक्षण व्हावे यासाठी खांडरे यांनी पॉलीहाऊस उभारले आहे.
मागील चार वर्षांपासून ते फुलशेतीचा व्यवसाय करतात. राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियानांतर्गत त्यांना पॉलीहाऊस टाकण्यासाठी अनुदानही मिळाले होते. शेती तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण व्हावी, यासाठी खांडरे यांनी कृषी व्यवसाय व्यवस्थापन हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम हैदराबाद येथून पूर्ण केला. पूर्ण जिल्ह्याचा अभ्यासदौरा करून फुलशेती पॉलीहाऊस शेडनेट आदीबाबतची परिपूर्ण माहिती घेतली. मागील काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. सिंचनासाठी पाणी कमी पडत आहे. हे बघून त्यांनी त्यांच्या शेताजवळील एक कि.मी. नाल्याचे स्वखर्चातून खोलीकरण केले. त्यावर वनराई बंधारे बांधले. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरून पाणीपातळीत वाढ झाली आहे. खांडरे यांच्या शेतात आधुनिक यंत्रसाम्रगी आहे.
सुधारित हळद लागवड, ढोबळी मिरची, टोमॅटो आदींची लागवडही ते करतात. याकामी त्यांना तालुका कृषी अधिकारी गोविंद कल्याणपाड यांचे सहकार्य लाभते. फुलशेतीसाठी त्यांनी उच्च तंत्रज्ञानाचा वापर केला. जरबेराची फुले त्यांनी नांदेड, नागपूर, हैदराबाद आदी बाजारपेठांत विक्री केली. खांडरे हे फुलशेतीसोबतच ढोबळी मिरची, केळी, हळद यासह भाजीपाला पिके घेतात. खर्च वजा जाता त्यांना १२ एकर शेतीतून ८ ते ९ लाख रुपये निव्वळ नफा मिळत असल्याचे खांडरे यांनी सांगितले. शेतात पाण्याची सोय असल्याने ठिंबक सिंचनाचा वापर ते करतात. शेतकऱ्यांना सर्वच १२ एकर शेतीला पाणी वर्षभर पुरावे यासाठी त्यांचे काटेकोर नियोजन असते. बारमाही पिके घेत असल्याने त्यांच्याकडे सतत पैसा खेळत असतो. वनराई बंधारे, नालाखोलीकरण, पुनर्भरण आदी कामे त्यांनी केली आहेत.