करंजी : वसमत तालुक्यातील करंजी व परिसरात यावर्षी पाण्याची मुबलकता असल्याने रबी हंगामात शेतकऱ्यांनी हरभरा पिकाचा पेरा जास्तीचा घेतला आहे. सध्या हरभरा पीक जोमात असून, हरभरा पिकाचा उतारा चांगला येईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
करंजी परिसरातील गुंडा, करंजी, विरेगाव, दारेफळ, गोळेगाव, आदी गावांमध्ये यावर्षी ज्वारी, गहू, भूईमूग, ऊस, आदी पिकांबरोबर दुहेरी उत्पन्न देणारे हरभरा पीकही शेतकऱ्यांनी घेतले आहे. यावर्षी हरभरा पीक जोमात आले असून, हे पीक शेतकऱ्यांना तारेल, असे वाटते.
सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अजूनही बहुतांश शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नाही. ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नाही त्यांना लवकर अनुदान द्यावे, अशी मागणी विजय वीर, भानुदास आव्हाड, केशव मलांडे, एकनाथ मलांडे, किसन इंगोले, किसन भालेराव यांनी केली आहे.