औंढा नागनाथ : तालुक्यातील सावळी बहिणाराव ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेला संगणक चालक याच्या डोक्यात दगड मारून त्याचा खून केल्याची घटना रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. हा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
सावळी बहिणाराव ग्रामपंचायतीमध्ये सचिन धुळबा धवसे (वय ३०) हे मागील १० वर्षांपासून संगणक चालक म्हणून कार्यरत हाेते. रविवारी गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात रात्री उशिराने त्यांच्या डोक्यात दगड मारून खून केल्याचे प्राथमिक पाहणीत निदर्शनास आले. ही घटना सकाळच्या सुमारास शेतात गेलेल्या शेतकऱ्याच्या निदर्शनास आली. याबाबत औंढा पोलीस प्रशासनाला माहिती देताच, घटनास्थळी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, सा. पोलीस निरीक्षक मुंजाजी वाघमारे, संदीप टाक, गिरी यांनी पंचनामा केला. नेमक्या काेणत्या कारणांतून त्या तरुणाचा खून झाला, याबाबतचा अधिक तपास सुरू आहे.
घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे उदय खंडेराय, श्वानपथक, ठसेतज्ज्ञांना पाचारण करीत, खुनाच्या तपासाचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी मृताचा मोबाईल आढळून आला आहे. याबाबत पोलिसांनी गावात अधिक चौकशी करीत, अनैतिक संबंधातून खून झाला असल्याने, या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयात मृताचे शवविच्छेदन केले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती.