सध्या सर्वच गावात निवडणुकीची रंगत वाढलेली पहायला मिळत आहे. प्रत्येक गावात प्रचार जोरात सुरु आहे. गावपातळीवरील वातावरण चांगलेच तापलेले आहे. सर्वच उमेदवार व त्यांचे समर्थक मतदारांशी संपर्क करीत आहेत. उमेदवार आश्वासनांची खैरात देत आहेत. कार्यकर्ते सांभाळता सांभाळता गाव पुढाऱ्याची मात्र चांगलीच दमछाक होताना दिसून येत आहे.
प्रत्येक प्रतिस्पर्धी उमेदवार व त्यांचे पॅनलप्रमुखही निवडणूक प्रतिष्ठेची समजत आहेत. आम्ही निवडून आल्यानंतर गावाचा सर्वांगीण विकास करू गावाचा कायापालट करू, अशी भाषा बोलत आहेत. गावातील अंतर्गत रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, नाल्याचा प्रश्न, सर्वच समाजासाठी सामाजिक सभागृह, मागेल त्याला घरकुल आदी विकासकामे खेचून आणूत, अशी पोकळ आश्वासने सर्वच उमेदवार मतदारांना देत आहेत.
सर्वच उमेदवार प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या प्रचार यंत्रणेवर नजर ठेवून आहेत. आपण कुठे कमी पडतो का ? याची चाचपणी ते करीत आहेत. सध्या प्रत्येक गावातील वातावरण चांगलेच तापले असून आपणच निवडून येतो, अशी फुशारकी प्रत्येक उमेदवार मतदारांसमोर मारत आहेत. सर्वजण विकासाच्या आणाभाका घेत असल्यामुळे मतदान कोणाला करावे, असा प्रश्न मतदारांसमोर पडला आहे. प्रत्येक मतदारांची उमेदवार आस्थेवाईकपणे चौकशी करीत आहेत. बाहेरगावी किती मतदार गेलेले आहेत, त्यांच्याशी उमेदवार व त्यांचे समर्थक संपर्क करीत आहेत. प्रत्येक पक्षाचे वरिष्ठ नेते मात्र प्रचारापासून दूर असल्याचे दिसून येत आहेत. प्रत्येक उमेदवार व त्यांच्या पॅनलप्रमुखाच्या तोंडातून विकासाची भाषा बोलल्या जात आहे. गुण्यागोविंदाने राहणारे आज मात्र एकमेकापासून अबोला धरीत आहेत. निवडणुका येतात व जातात ग्रामस्थांनी मात्र निवडणुकीपुरता विरोध करून नंतर गुण्यागोविंदाने गावात राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.