हिंगोली : जल जीवनमिशनचे काम हस्तांतरित करून घेऊन कामाचा पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी व नळ जोडणी कामाचे कार्यारंभ आदेश देण्यासाठी १ लाख ५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. ही कारवाई औंढा ना. तालुक्यातील शिरड शहापूर येथे २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.
सूर्यकांत शंकरराव खाडे असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे. औंढा ना. तालुक्यातील पूर येथे जल जीवन मिशनचे काम मंजूर झाले होते. हे काम हस्तांतरित करून घेऊन कामाच्या पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी व नळ जोडणी कामाचे कार्यारंभ आदेश देण्यासाठी ग्रामसेवक सूर्यकांत खाडे याने कंत्राटदारास १ लाख १५ हजारांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती १ लाख ५ हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी हिंगोलीच्यालाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दाखल केली.
त्यानंतर लाचलुचपतचे पोलिस उपअधीक्षक अनिल कटके, पोलिस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर, सहा पोलिस उपनिरीक्षक युनूस शेख, विजय शुक्ला, पोलिस अंमलदार रवींद्र वरणे, ज्ञानेश्वर पंचलिंगे,तानाजी मुंढे, गजानन पवार, गोविंद शिंदे, भगवान मंडलिक, चापोह अकबर, योगिता अवचार, राजाराम फुपाटे, शिवाजी वाघ आदींच्या पथकाने शिरड शहापूर येथे सापळा लावला. यावेळी लाचखोर खाडे याने १ लाख ५ हजारांची रक्कम स्वीकारताच पथकाने त्यास रंगेहाथ पकडले. याप्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
यापूर्वीही तक्रारींचा सूरलाचखोर ग्रामसेवक सूर्यकांत खाडे याच्याविरुद्ध पूर ग्रामस्थांमधून तक्रारीचा सूर उमटत होता. या गावातील पाणीपुरवठा योजनेच्या तक्रारीत लक्ष घालत नसल्याचा आरोप होता. तर, त्याचा पदभार काढून इतर ग्रामसेवकाकडे साेपवावा, अशी मागणीही केली जात होती.