हिंगोली : सेनगाव तालुक्यातील गुगुळपिंपरी येथील ग्रामसेवकास २० सप्टेंबर रोजी दीड हजाराची लाच स्वीकारताना ग्रामपंचायत कार्यालयात एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.
तक्रारदार यांच्या भावाच्या नावाने असलेल्या मालमत्ता १४० मधील जागा वाटणीपत्राद्वारे तक्रारदाराच्या नावे करून देऊन तसा फेर घेत नमुना नंबर ८ देण्यासाठी गुगुळपिंपरी येथील ग्रामसेवक अमोल दामोदर शिंदे यांनी दीड हजार रूपयाची मागणी केली. याबाबत तक्रारदार याने रितसर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ग्रामसेवक शासकीय कामासाठी पैसे मागत असल्याची लेखी तक्रार केली. त्यानुसार १८ सप्टेंबर रोजी एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता ग्रामसेवक अमोल शिंदे यांनी पैसे घेण्याची सहमती दर्शविली.
त्यानंतर २० सप्टेंबर रोजी एसीबीच्या पथकाने सेनगाव तालुक्यातील गुगुळपिंपरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन थेट कारवाई केली व ग्रामसेवक अमोल शिंदे यास तक्रारदाराकडून दीड हजार लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले. सदर कारवाई अॅन्टी करप्शन ब्युरो नांदेड पोलीस अधीक्षक कल्पना बारवरकर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस उपअधीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि ममता अफुने, पोनि नितीन देशमुख, पोहेकाँ अभिमन्यु कांदे, विजयकुमार उपरे, आढाव, महारूद्रा कबाडे, विनोद देशमुख आदींनी केली.