हिंगोली : प्रतिबंधमुक्त व्यवसाय व प्रतिष्ठाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत चालू ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी काढला असून मागील काही दिवसांपासून त्याची प्रतीक्षा होती. यावरून व्यापा-यांमध्ये ओरडही होताना दिसत होती. आता हे आदेश काढल्याने नव्याने अनेक बाबींना शिथिलता मिळाली आहे.
प्रतिबंधमुक्तीमध्ये क्रीडासंकुल, क्रीडामैदान व इतर सार्वजनिक खुली मैदाने वैयक्तिक व्यायामासाठी चालू राहतील. परंतु पे्रक्षक व सामूहिक कार्यक्रमासाठी अशा ठिकाणी बंदी असेल. सर्व शारीरिक व्यायाम व हालचाली सामाजिक अंतर ठेवून करता येतील. सर्व खाजगी सार्वजनिक वाहतूक करताना दुचाकी वाहन केवळ एका व्यक्तीसाठी, तीन चाकी वाहन १+२ असे तीन व्यक्तींसाठी, चारचाकी वाहन १+२ अशारीतीने वापरता येईल. जिल्हांतर्गत बस वाहतूक सेवा प्रतिबस वाहन क्षमतेच्या ५0 टक्क्यांपर्यंतच्या मर्यादेत सामाजिक अंतराचे पालन करून व सॅनिटायझरचा वापर करून सुरू करता येईल. कंटेनमेंट झोनमधील गावे व भाग प्रतिबंध वगळून जिल्हांतर्गत सर्व दुकाने, उद्योग, व्यवसाय, अस्थापना दररोज सकाळी ९ ते ५ या वेळेत अटींच्या अधिन राहून सुरू ठेवता येतील. शिवाय रात्री ७ ते सकाळी ७ या वेळेत जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी लागू असेल.
ही दुकाने सुरू करताना दुकानातील मालक, ग्राहक, कर्मचारी यांच्या चेह-यावर मास्क असणे बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी, दुकान अस्थापनांच्या परिसरात व इतर ठिकाणी थुंकल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. सार्वजनिक ठिकाण व दुकान परिसरात सामाजिक अंतर ठेवणे बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी व दुकानाच्या ठिकाणी मद्यपान, तंबाखू, गुटखा, पान सेवनास प्रतिबंध असेल, एकाचवेळेस दुकानात पाचपेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश राहणार नाही. तसेच दुकानाबाहेर एक मीटर अंतराचा चौकोन आखून द्यावा, त्या ठिकाणी सॉनिटायझर व साबनचा वापर करणे बंधनकारक आहे़ माणवी संपर्कत येणाºया व सर्व वस्तू वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे़ ग्राहकाकडून खरेदी नंतर पैशाची देवाण घेवाण डिजीटलच्या सहाय्याने करण्यास भर द्यावा असेही आदेशात म्हटले आहे़
या बाबींना प्रतिबंध कायम शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण संस्था, खाजगी शिकवणीवर्ग बंद राहतील, आॅनलाईन शिकवणीवर्गास परवानगी राहील. हॉटेल, रेस्टॉरंट सेवा बंद राहतील, आरोग्य, पोलीस, शासकीय अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी, अडकून पडलेले व्यक्ती, पर्यटक व विलगीकरण कक्षात सुरू असलेल्या सेवा, बसस्थानक, रेल्वेस्थानकावरील चालू असलेल्या हॉटेल सेवा सुरू राहतील. हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळींना घरपोच सेवा देण्यास मुभा आहे.
सर्व सिनेमागृह, केश कर्तनालय, शॉपींग मॉल, व्यायामशाळा, जलतरण पूल, करमणूक ठिकाण, बार, असेम्बली हॉल बंद राहतील. सर्व सामाजिक राजकीय, क्रीडाविषयक, सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमात एकत्र येण्यास बंदी राहील. तसेच सर्व प्रार्थनास्थळे धार्मिक कार्यक्रमासाठी बंद राहतील.