हिंगोली जिल्ह्यात १ ते १० सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यातील विविध भागात अतिवृष्टीचा सामना करावा लागला. यामध्ये नदी, नाल्यांच्या काठच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांच्या विनंतीवरून काँग्रेसच्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी नवघरे यांच्या मतदारसंघात विविध कामांच्या उद्घाटनासाठी हा दौरा आयोजित केला होता. मात्र तत्पूर्वी आरळ परिसरातील नुकसानीच्या पाहणीचा त्यांनी आग्रह धरला. आरळनजीक त्यांचा ताफा थांबताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले. त्यानंतर काही अंतरावर गेल्यावर गायकवाड यांनी पीक नुकसानीची पाहणी केली. या फटाक्यांबाबत पालकमंत्रीही अनभिज्ञ होत्या. शिवाय स्थानिक कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात स्वागतासाठी थांबलोय असे समजून फटाक्यांची लड लावली. मात्र दुसरीकडे आमदारांनी पीक पाहणीचा आग्रह धरल्याने तिकडेही जावे लागले. मात्र या सगळ्या प्रकारात फटाके फोडून अतिवृष्टीतील नुकसानीची पाहणी झाल्याचीच चर्चा रंगली. फटाके फोडण्याचा प्रकार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या हातून गैरसमजातून घटला की जाणीवपूर्वक झाला, यावरूनही चर्चा रंगली आहे.
याबाबत आमदार राजू नवघरे यांना विचारले असता ते म्हणाले, पीक पाहणी व फोडलेले फटाके या दोन्ही वेगवेगळ्या घटना आहेत. मात्र त्या एकत्रित दाखविल्या जात आहेत. कार्यकर्त्यांनी वेगळ्या ठिकाणी स्वागत केले. पाहणी वेगळ्या ठिकाणी केली. कुणी स्वागत केले म्हणून जनतेच्या अडचणी जाणून घ्यायला जायचे नाही का? जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून कोणत्याही परिस्थितीत आम्हाला आमचे कर्तव्य पार पाडावे लागते. पालकमंत्री वर्षाताई गायकवाड आणि आम्ही पीक नुकसानीची पाहणी करून कर्तव्यच पार पाडत होतो. कोणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असेलही मात्र जनता सुज्ञ आहे.